धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील चालू व प्रलंबित प्रकल्पावर दुरगामी सकारात्मक परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले. यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला निश्चितच मोठी गती मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्प, कौडगाव येथील एमआयडीसीच्या माध्यमातून उभारण्यात येणारा तांत्रिक वस्त्रनिर्मिती प्रकल्प, तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी लागणाऱ्या जागेची उपलब्धता या सर्व महत्त्वाच्या विषयावर बैठकीत सर्वंकष चर्चा झाली. कालमर्यादा ठरवून देत झालेल्या निर्णयांची सक्त अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विनंतीवरुन सदरील बैठक आयोजित करण्यात आली होती.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प टप्पा एक अंतर्गत चालू असलेले काम जुलै महिना अखेर पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक व भूसंपादनाच्या अडचणीमुळे 80% काम पूर्ण झाल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. या अडचणी दूर करून डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्याचे देखील त्यांनी मान्य केले आहे.
निम्न तेरणा उपसा सिंचन योजना दुरुस्तीच्या कामास तांत्रिक मान्यता प्राप्त असून पुढील आठवड्यात प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेाठी प्रस्ताव सादर करण्यास जलसंपदा तसेच वित्त व नियोजन विभागाच्या सचिवांना आदेशित करण्यात आले आहे. कौडगांव औद्योगिक वसाहतीमध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून मंजूर तांत्रिक वस्त्रनिर्मिती प्रकल्पासाठी अँकर युनिट आणणे व तेथील पायाभूत सुविधांची कामे सुरू करण्याच्या सुचना एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या. तर महाजनकोच्या कार्यकारी संचालकांना उंचवट्यावरील उपलब्ध जागेवर सौर उर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे सुचित करण्यात आले आहे.
सदरील बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव नियोजन राजगोपाल देवरा, प्रधान सचिव जलसंपदा दीपक कपूर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव गणेश पाटील, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, कृष्णा खोऱ्याचे कार्यकारी संचालक त्रिमनवार, जिल्हाधिकारी धाराशिव डॉ. सचिन ओंबासे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.