कळंब (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळा भाटशिरपुरा येथे रोजी विद्यार्थ्यांसाठी नेहमी विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लागवी यासाठी शाळेत बालकवी संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध बालकवी आश्रुबा कोठावळे संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब व  शीघ्रकवी मारुती खुडे सर प्रा. शाळा देवळाली हे उपस्थित होते. 

प्रथम शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. त्यानंतर शाळेतील मुलांनी झाड,आई, शेतकरी अशा विविध विषयांवर कविता सादर केल्या. यामध्ये कु.वैशाली ईश्वर मस्के व कु.शिवन्या अतुल गायकवाड यांच्या कवितांनी मान्यवरांची दाद मिळवली. याप्रसंगी आश्रुबा कोठावळे यांनी त्यांच्या शब्दपेरणी या बालकविता संग्रहातील मैत्री, झिम्मा फुगडी, आला श्रावण, अशा विविध बालकविता गाण्याच्या स्वरूपात सादर केल्या, त्याचबरोबर कथांचे बीजगोळे या बालकथा संग्रहातील अनेक गोष्टींचे सादरीकरण केले. यामध्ये  निसर्गातील विविध गोष्टींचे वर्णन करणाऱ्या कवितांनी व गोष्टींनी मुलांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये वीर रसावर आधारित छत्रपती शंभुराजे यांची कविता सादर केली. यानंतर शीघ्रकवी श्री मारुती खुडे सर यांनी विविध विषयावर आपल्या बोलक्या कविता सादर केल्या. यामध्ये शाळेत रोज जाण्याचे महत्त्व सांगणारी घे दप्तर पाठी, मुलींना काळा प्रमाणे वागण्याची शिकवण देणारी चल ग ताई ,त्याचबरोबर स्त्री शिक्षण व संरक्षणावर भाष्य करणारी ऐक द्रौपदी तसेच शेतकऱ्याची व्यथा मांडणारी ऐक माझ्या धन्या अशा विविध विषयांवर कविता सादर केल्या. यानंतर विद्यार्थ्यांनी कवींना विविध प्रश्न विचारून साहित्याच्या संदर्भातील विविध गोष्टी जाणून घेतल्या. जसे की कविता कशी लिहावी?, ती कशी असते? कविता लिहायला किती वेळ लागतो?तुम्ही पहिली कविता कधी लिहिली? तुम्हाला  कविता लेखनाची प्रेरणा कोठून मिळाली? असे विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

याप्रसंगी शाळेतील मुलांनी नियमीत ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करण्याचे व रोज दैनंदिनी लिहिण्याचे वचन दिले. त्याचबरोबर कविता लेखनाचा छंद जोपासण्याचे आश्वासन दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत तांबारे सर तर आभार प्रदर्शन श्री अमोल बाभळे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन तामाने ,शहाजी बनसोडे, प्रमोदिनी होळे, रंजना थोरात, लिंबराज सुरवसे सर, श्रीमती वाघमारे मॅडम,यांनी परिश्रम घेतले.

 
Top