धाराशिव (प्रतिनिधी) -अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात एससी, एसटी प्रवर्गातील संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. धाराशिव शहरातही विविध संघटनांनी व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे बाजारपेठे सकाळपासून शुकशुकाट पाहावयास मिळाला.
आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी निर्णय दिला होता. या निर्णयानंतर विविध सामाजिक संघटना, पक्षांकडून विरोध दर्शविण्यात आला होता. त्यानंतर काही संघटनांनी 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली. सकाळपासून नेहरू चौक, सावरकर चौक, देशपांडे स्टॅन्ड, जिजाऊ चौकातील काही दुकाने सकाळपासून बंद होती. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी 9 वाजता फिरून बंद असल्याचे सांगण्यात आल्याने विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती.
परंडा येथे ही बंद
सुप्रीम कोर्टाने आरक्षणासंदर्भात दिलेल्या निकालाचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या परंडा शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी संजयकुमार बनसोडे , राहूल भैय्या बनसोडे यांनी सुप्रीम कोर्टाने आरक्षणासंदर्भात दिलेल्या निकालाचा निषेध केला. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्याप्रमाणे आरक्षण ठेवावे. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय लागू करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.