भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील आंतरगाव येथे मुलाने वडिलांचा खून करून मृतदेह बाणगंगा नदीत फेकल्याची घटना दोन दिवसानंतर उघडकीस आली. परंडा पोलिसांनी खून करणाऱ्या मुलाला जेरबंद केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंतरगाव येथील काही नागरिकांनी शनिवारी दि. 10 ऑगस्ट रोजी येथील बाणगंगा नदीत मृतदेह तरंगत असल्याचे पोलिसांना दूरध्वनीवरून सांगितले. जवळा दूरक्षेत्र येथील पोलिस हवालदार घोळवे व पोलिस नाईक स्वामी यांना रवाना केले. घटनास्थळी पोहोचून पोलिस अंमलदारांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाच्या डोके व चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले. मृत व्यक्तीचे नाव विक्रम गोरे असून, त्यांचे घर नदीपासून 60 ते 70 मीटर अंतरावर आहे. पोलिस अंमलदार मृताच्या घरी गेले असता मुले विजय गोरे हा हाता शस्त्र घेवून पोलिसांच्या दिशेने धावून आला. यावरून विजय यानेच त्याच्या वडिलांचा खून केल्याचा संशय बळावला. पोलिस निरीक्षकांना ही माहिती दिल्यावर त्यांनी सपोनि शंकर सुर्वे, सपोउपनि मुळे, नितीन गुंडाळे यांना घटनास्थळी पाठवले. पोलिस निरीक्षक इज्जपवार आरोपी मुलगा विजय गोरे याला पकडण्यास गेले असता त्याने पळ काढला. पोलिसांनी तीन ते चार किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडले. चौकशी केली असता गुरूवारी दि. 8 ऑगस्ट रोजी रात्री त्यानेच रागाच्या भरात वडिलांचा खून केल्याचे कबुल केले. घटनास्थळ दाखवून खून करण्यासाठी वापरलेले हत्यारही काढून दिले.