धाराशिव (प्रतिनिधी) - सूर निरागस हो..., सुंदर ते ध्यान..., कानडा राजा पंढरीचा..., कांदा मुळा भाजी..., नाम गाऊ, नाम घेऊ..., अशा एकापेक्षा एक सुगम गीतांनी रसिक मंत्रमूग्ध झाले. निमित्त होते शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्यावतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शनिवार, 17 ऑगस्ट रोजी सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नटराजाचे पूजन करून व सिने अभिनेते दिवंगत विजय कदम यांना श्रध्दांजली वाहून उद्घाटन करण्यात आले. यावेळी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष धनंजय शिंगाडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारिणी सदस्य विशाल शिंगाडे, तेजस्विनी कदम, यतीराज वाकडे, नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लौटके, मुंबई विद्यापीठातील लोककला विभागाचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष अनंत जोशी, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव उपस्थित होते.

या सुगम गायनामध्ये गायक सुजित माने व गायिका प्रियंका बनसोडे यांनी भावगीत, भक्तिगीत, चित्रपट गीत, नाट्यगीत, ठुमरी, भैरवी, भजन तसेच गझलही सादर केली. यास तबलावादक विशाल सोमवंशी, संवादिनी सुनिल माने, पखवाज रमन भेाईभार, सिंथ दीपक लातूरकर यांनी साथ दिली. यावेळी शहरातील रसिकप्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top