धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि धाराशिव मध्यवर्ती बस स्थानक ते भवानी चौक सांजा दरम्यानचा रस्ता तात्काळ दुरूस्त करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देताच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. बुधवार, 7 ऑगस्ट रोजी शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव व राकेश सूर्यवंशी यांनी या मार्गावरील रस्त्यांच्या डागडुजीची पाहणी केली. जनतेचे बेहाल थांबविण्यासाठी साबां विभागाने सुरु केलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
शिवसेनेचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाशराजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निद्रिस्त असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला 26 जुलै रोजी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला होता. राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि मध्यवर्ती बस स्थानक ते मवानी चौक-सांजा नाका रहदारीच्या रस्त्याची प्रचंड मोठी दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे अपघात होत आहेत, या रस्त्यावर नामांकित शाळा व कॉलेज असल्यामुळे शाळा व कॉलेजचे विद्यार्थी यांना रस्त्यावरून ये-जा करताना नाहक त्रास होत आहे.परिणामी आतापर्यंत छोटे-मोठे अपघात देखील झाले आहेत हा रस्ता अनेक गावासाठी शहरात प्रवेश करण्याचा मुख्य रस्ता असल्यामुळे सर्वसामान्य वयोवृद्ध विद्यार्थी या वरून प्रवास करीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात यावर रहदारी आहे, त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करून नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. आज बुधवारी पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव व राकेश सूर्यवंशी यांनी या रस्त्यांची स्वतः पाहणी केली. रस्त्याची झालेली दुरावस्था दूर करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुढाकार घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला ताळ्यावर आणल्याबद्दल स्थानिक नागरिक राकेश सूर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले.