धाराशिव (प्रतिनिधी)- कोल्हापूर येथील दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार व हत्या, बदलापूर, ठाणे येथील दोन बालिकांचे लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या प्रयत्नाचा तसेच पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या डॉक्टर युवतीवर बलात्कार व हत्येचा जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभागाच्या वतीने तीव्र निषेध करुन दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत शुक्रवारी (दि.23) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, कोल्हापूर येथील दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार व हत्या व बदलापूर, ठाणे येथील तीन आणि चार वर्षांच्या दोन लहान मुलींचे शाळेत लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या प्रयत्नाचा तसेच कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कार करुन क्रूर हत्येचा निषेध करत आहोत. कोल्हापूर व बदलापूर प्रकरणात आम्ही आरोपींविरुद्ध त्वरित खटला चालवून कठोर शिक्षा देण्यात यावी, ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या अधिकाऱ्यांना सुरक्षा आणि संरक्षण निकषांचे पालन न केल्याबद्दल दोषी ठरवून कारवाई करण्यात यावी. ज्या पोलिसांनी एफआयआर नोंदविण्यात उशीर केला त्या बदलापूर पोलिस अधिकाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात यावी. कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर प्रकरणात पीडितच्या शरीरावर अनेक जखमा आणि गळा आवळल्याचे पुरावे आहेत. या प्रकरणांची सर्वसमावेशक चौकशी करून पीडितांना न्याय मिळवून देण्याची आणि कायदा व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये कडक सुरक्षा नियमावली राबविणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यामध्ये सुरक्षा कॅमेरे, चांगली प्रकाश योजना, आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणालींचा समावेश असावा. महिलांचा आदर वाढविण्यासाठी आणि लैंगिक हिंसाचाराबद्दल जनजागृती करण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे. समाजाच्या स्तरावर सहमतीच्या महत्त्वाविषयी आणि महिलांविरुद्ध हिंसाचाराचे गंभीर परिणाम याबद्दल जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जावेत. लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांसाठी सल्ला, कायदेशीर सहाय्यता आणि वैद्यकीय काळजी यांसह समर्पित सहाय्यता प्रणालींची स्थापना करणे आवश्यक आहे, ज्यामुळे पीडितांनी पुढे येऊन गुन्ह्यांची नोंद करणे सोपे होईल. कायदा अंमलबजावणी यंत्रणेमध्ये जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करतो, ज्यामुळे सर्व अधिकारी नागरिकांचे संरक्षण करण्याचे कर्तव्य पार पाडतील आणि महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करतील. समाज आणि सरकारला शाळांमध्ये नैतिक शास्त्राची शिकवण सुरू करण्याची आणि चरित्रनिर्माणाच्या कामावर भर देण्याची विनंती करतो. मुख्य प्रवाहातील माध्यमे, सामाजिक माध्यमे आणि मनोरंजन उद्योगात उघडपणे चालवले जाणारे अश्लीलता, अशिष्टता, महिलांचे वस्तूकरण आणि अश्लीलतेला आळा घालण्याची आणि त्याचे नियंत्रण करण्याची गरज आहे. लैंगिक गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एक पवित्र आणि ईशभय युक्त समाज निर्माण करणे, जिथे महिलांचा सन्मान केला जातो आणि त्यांना त्यांचे खरे आणि प्रतिष्ठित स्थान दिले जाते.
भविष्यात अशा अमानुष घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सरकारने कठोर पावले उचलावीत व उपरोक्त प्रकरणात आरोपी विरूद्ध जलदगती कोर्टात खटला चालवून पिडितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जमात-ए-इस्लामी हिंदच्या धाराशिव महिला विभाग शहराध्यक्ष खैरुन्निसा सजीयोद्दीन शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, सुलताना शेख, आस्मॉ शेख, कौसर पटेल, नूरजहाँ सय्यद, यास्मीन सय्यद, मसरुर सिद्दीकी, जरीना पठाण, माधवी गवारे, सोनाली पडवळ, रेखा जेवळीकर, अख्तर शेख, हीना शेख, आयेशा शेख, निदा शेख, अफरोज शेख, सकिमा शेख, मुलिहा सय्यद, आस्मा भामेड, तनीम सिद्दीकी, सबिना सिद्दीकी, सलिया शेख, तमाजुर फैजान, शाहीन तांबोळी, सुमय्या अत्तार, तस्लीम तांबोळी, सबिहा तांबोळी, फातेमा तांबोळी, झैनाब तांबोळी, मुमताज तांबोळी, शाहेदा तांबोळी यांची स्वाक्षरी आहे.