धाराशिव (प्रतिनिधी)-या हकीकत अशी की, नालंदा इस्टेट डेव्हलपर्स यांची नेहरूनगर येथे गट नं. 28/1/2/2 मध्ये 86 आर खुली जागा असून महसूल प्रशासनात झालेल्या संगणकीकरणानंतर जागेचा सातबारा उतारा बंद दाखवत असल्याने नालंदा कंपनीने तलाठी नेहरूनगर यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून बंद झालेला सातबारा पुन्हा सुरू करण्यात यावा यासाठी अर्ज केलेला होता.
नेहरूनगर येथील तलाठी पवनकुमार चव्हाण व सोरेगाव येथील मंडल अधिकारी संदीप लटके यांनी सदरचा सातबारा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार कुरेशी यांच्याकडे रक्कम रुपये 6,00,000/- लाचेची मागणीने कुरेशी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे दि. 15/08/2024 रोजी तक्रार नोंदवलेली होती.
सदरच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागामार्फत करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये आरोपी मंडल अधिकारी संदीप लटके व तलाठी पवनकुमार चव्हाण यांनी फिर्यादीकडे सातबारा पुन्हा सुरू करण्यासाठी सुरुवातीस रक्कम रु. 5,00,000/- च्या लाचेची मागणी केली व तडजोडीअंती रक्कम रुपये 4,00,000/- ठरवून त्यापैकी 2,00,000/- रुपये पहिला हप्ता म्हणून लाच स्वीकारण्याचे कबूल करून मागणी केली.
सदर लाचेची मागणी झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढील कारवाई करत असताना आरोपी लटके व चव्हाण यांना संशय आल्याने त्यांनी फिर्यादीकडून लाचेची रक्कम स्वीकारली नव्हती. त्यानुसार लोकसेवक आरोपींच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर प्रकरणात आरोपी मंडल अधिकारी संदीप लटके व तलाठी पवनकुमार चव्हाण यांनी ॲड. निलेश जोशी यांच्यावतीने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. सदर अटकपूर्व जामीनाच्यावेळी ॲड. निलेश जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. जे. कटारिया सो यांनी आरोपी मंडल अधिकारी संदीप लटके व तलाठी पवनकुमार चव्हाण यांची प्रत्येकी रक्कम रुपये 25,000/- च्या जामिनावर मुक्तता केली. यात आरोपींच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. राणी गाजूल, ॲड. ओंकार परदेशी यांनी काम पाहिले.