धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील काजळा येथे श्री सद्गुरू ब्रम्हचारी रामानंद महाराज यांच्या जीवन चरित्रावरील ग्रंथाचे प्रकाशन रविवार दि.4 ऑगस्ट रोजी दु. 4 वा. करण्यात येणार आहे. काजळा येथील रामानंद महाराज मठामध्ये पंढरपूर येथील श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदीर समितीचे सहअध्यक्ष, सुप्रसिद्ध किर्तनकार हभप गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांची उपस्थिती राहणार आहे. राजुरी (ता.धाराशिव) येथील प्रगतशील शेतकरी व श्री रामानंद महाराजांचे भक्त हरीदास उर्फ नाना वाघमोडे यांनी हा ग्रंथ लिहीला आहे. या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिध्द कीर्तनकार हभप नवनाथ महाराज चिखलीकर, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, श्री रामानंद महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रदीप शेळके यांची उपस्थिती लाभणार आहे. लेखक श्री वाघमोडे यांनी सांगितले, सद्गुरू श्री रामानंद महाराज हे काही वर्षे राजुरी (ता.धाराशिव) येथील आमच्या शेतामध्ये वास्तव्यास होते. महाराजांची आमचे कुटुंबीय तसेच शेतातील सालगडी सेवा करीत असत. या दरम्यान आमच्या गड्याला महाराजांच्या जीवनातील काही अद्भूत व चमत्कारीक प्रसंग साक्षात पहावयास मिळाल्या. त्या शेतमजुराने सांगितलेल्या सत्य घटना मी एका वहीमध्ये लिहुन ठेवल्या. आज 60 वर्षानंतर त्या सर्व कहाणी एकत्र करून त्याचे ग्रंथामध्ये रुपांतर करण्यात आले आहे. या ग्रंथाचे प्रकाशन करून रामानंद महाराजांच्या हजारो, लाखो भक्तांसाठी हा ग्रंथ उपलब्ध करून देण्यात खूप आनंद होत असल्याचे श्री वाघमोडे यांनी म्हटले. या प्रकाशन सोहळ्यास धाराशिव, चिखली, काजळा, राजुरी, सारोळा, वाणेवाडी, दारफळ, वाघोली आदी गावातील ग्रामस्थ व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लेखक श्री वाघमोडे यांनी केले आहे.

 
Top