धाराशिव (प्रतिनिधी)- पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय प्रशासनाला 28 ऑगस्ट रोजी आयोजित विद्यालय सल्लागार समितीच्या बैठकीत दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, शिक्षणाधिकारी सुधा साळूंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य रविंद्र आडेकर,जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के.वाय.इंगळे, शिक्षणतज्ञ डॉ.सतिश कदम,शिक्षक एस.डी.खोब्रागडे,एस.एस. माने,पालक प्रतिनिधी डॉ.रामेश्वर यादव, कार्यालय अधीक्षक एम.पी.कुलकर्णी व ए.एन. बोडके यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविक करताना प्राचार्य श्री. इंगळे यांनी पीएम श्री जवाहर विद्यालयातील विद्यार्थ्याच्या विविध समस्याबाबतची माहिती दिली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी नवोदय विद्यालय प्रशासनाला निर्देश देऊन विद्यालयाने मांडलेल्या विविध समस्यांच्या बाबतीत जिल्हा प्रशासनास प्रस्ताव सादर करण्यात यावा.विद्यालयातील विद्यार्थ्यांना कंप्युटर उपलब्ध करुन देण्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.विद्यार्थ्यांना शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आर.ओ उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी ओपन जिमचाही प्रस्ताव क्रीडा विभागास सादर करुन त्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
जवाहर नवोदय विद्यालय परिसरातील संरक्षण भिंतीची उंचीही वाढविण्याचे प्रस्तावित असून ते नगर परिषदेच्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया सुरु आहे.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने परिसरातील सर्व इमारतींचे स्ट्रकचरल ऑडीट करण्यात यावे याची मागणी जवाहर नवोदय विद्यालय प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.त्यासही त्यांनी लवकरात लवकर करुन घेण्याच्या सुचना दिल्या.तसेच तुळजापूर येथील पीएम श्री जवाहर नवोदय येथून 10 वी नंतर लातूर येथे पुढील शिक्षण घेण्यासाठी जातात.परंतू यापुढे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासह विविध स्वरुपाचे कोचिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.त्यासाठी विद्यालयाने निधी देवून ऑनलाईन क्लाससारख्या सुविधा विद्यार्थ्यांना निर्माण करुन देण्याच्या सुचना यावेळी डॉ. ओंबासे यांनी केल्या.
पाणीटंचाईची समस्या सुटणार
पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय येथे दर उन्हाळयामध्ये विद्यार्थ्यांसह निवासी शिक्षकांना पाण्याची समस्या जाणवते.हा प्रश्नही सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चेसाठी आला.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी विद्यालयास कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगून तसे प्रस्ताव तयार करण्याच्या सुचनाही त्यांना दिल्या.
मुलांनाही मिळणार वॉटर हिटरचे पाणी
पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय येथे यापूर्वी केवळ मुलींच्या वस्तीगृहासाठीच सोलर वॉटर हिटर बसविण्यात आले होते.परंतू सल्लागार समितीच्या बैठकीत पालक प्रतिनिधींनी मुले हे थंड पाण्याने आंघोळ करतात,त्यांना आंघोळीसाठी वॉटर हिटर बसविण्याची मागणी केली.यासाठी निधीची तरतूद करुन देण्यात येईल.त्यासाठीही प्रस्ताव सादर करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी यावेळी दिल्या.