धाराशिव (प्रतिनिधी)- अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी“ ही योजना राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर “ नमो शेतकरी महासन्मान निधी “ ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. जिल्हयातील बळीराजाला याचा आर्थिकस्तर उंचवण्यासाठी उपयोग होत आहे.

शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना सुरु केली.ही योजना केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषांनुसार आणि यासंदर्भात वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशाप्रमाणे तसेच राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना राबविण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. त्याबाबतचा प्रस्तावास 30 मे 2023 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.सन 2023-24 च्या अर्थ संकल्पात घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “ नमो शेतकरी महासन्मान निधी “ ही योजना सन 2023-24 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परिणामाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील.या बदलांकरीता राज्य शासनाकडून वेगळा शासन निर्णय काढण्याची आवश्यकता राहणार नाही.पी.एम. किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील. 


योजनेची कार्यपद्धती पुढील प्रमाणे आहे :

पी.एम.किसान योजनेच्या पीएफएमएस प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.या लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पोर्टलवरुन/प्रणालीवरुन बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जात आहे. 


नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल/प्रणाली

पी.एम. किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्याच्या निधीमधून लाभ देण्यात येत आहे.राज्यासाठी कृषि विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे योजनेसाठी पोर्टल / प्रणाली विकसित केली आहे.केंद्र शासनाच्या संमतीने पी.एम.किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या पोर्टल/प्रणालीचे एकत्रिकरण करण्यात आले आहे.अजेणेकरून अनुदान मिळण्यास पात्र लाभार्थ्यांच्या संख्येत होणारा बदल दोन्ही पोर्टलला एकाच वेळी प्रत्यक्षात येईल. 


निधी वितरणाची कार्यपध्दती 

“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ” या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या - योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त (कृषी) यांच्यामार्फत वितरीत करण्यात येत आहे.पहिला हप्ता हा माहे एप्रिल ते जुलै कालावधी लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाला आहे.तर दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये तर  तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च महिन्यात जमा होणार आहे. 


अंमलबजावणी करण्यासाठी संनियंत्रण समित्या

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ग्रामस्तर,तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या संनियंत्रण समित्यांमार्फत या योजनेचे संनियंत्रण करण्यात येत आहे.


जिल्हयातील 1 लक्ष 45 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर महासन्मानचा निधी जमा 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्हयातील पात्र शेतकऱ्यांना “ नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ” या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या - योजनेनुसार वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त (कृषी) यांच्यामार्फत वितरीत करण्यात आला आहे.यामध्ये भूम तालुक्यातील 18 हजार 870,कळंब 16 हजार 019,  लोहारा - 10 हजार 256,उमरगा - 20 हजार 812,उस्मानाबाद -29 हजार 015, परंडा -18 हजार 146,  तुळजापूर - 23 हजार 138, वाशी - 9 हजार 689 अशा सर्व तालुक्यातील जवळपास 1 लाख 45 हजार 207 शेतकऱ्यांच्या खात्यावर हा महासन्मान निधी जमा करण्यात आला आहे.तर या पुर्वीचा निधी हप्ताही त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.

 
Top