भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र दिल्लीच्या सत्तेला घाबरत नाही. लोकसभा निवडणूकीने दाखवून दिले. भाऊ विश्वासू असावा. लाडका नसला तरी चालेल अशी टिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरदचंद्र पवार) शिवस्वराज यात्रा मंगळवारी (ता. 13) शहरात आल्यानंतर जाहिर सभेचे आयोजन दुपार नंतर करण्यात आले होते.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार राहुल मोटे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे जेष्ठ नेते जीवनराव गोरे, डॉ. प्रतापसिह पाटील, वैशाली मोटे, तालुकाध्यक्ष ॲड संदीप पाटील, ॲड. हेमा पिंपळे, जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर, श्रीधर भंवर, दादासाहेब पाटील, राहूल बनसोडे, नसीरभाई शहा बर्फीवाले, राखी देशमुख आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, लाडकी बहिण योजनेचे पैसे परत घेण्याची कुणाची हिंमत नाही. मतासाठी लाडकी बहिण योजनेचे पैसे परत घेण्याची धमकी योग्य नाही. मताची अपेक्षा न ठेवता पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफी दिली. लोकसभा निवडणूकीने महाराष्ट्र दिल्लीच्या सत्तेला घाबरत नाही हे दाखवून दिले. आम्ही संविधान बदलू देणार नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखविण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले. पैसे वाटून महाराष्ट्राचा स्वाभिमान विकत घेता येत नाही हे सांगण्यासाठी यात्रेचे आयोजन असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले. केंद्र सरकार राज्य सरकारच्या कारभारावर त्यांनी टिका केली.