धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आदीवर प्रशासकाचे राज आहे. लोकप्रतिनिधीला सामान्य लोकांच्या मताचा धाक असतो त्यांच्या अनुरूप कामे करणे आवश्यक असून पाच वर्षाला जनतेच्या सामोरे जावे लागत असते. ती कामे करण्यासाठी प्रशासक राज लवकरात लवकर हटणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केले.

100 व्या नाट्य संमेलनानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.  त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  यावेळी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख, संमेलनाचे स्वागताध्यक्ष धनंजय शिंगाडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद धाराशिव शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे, सल्लागार राजेंद्र अत्रे, प्रशांत पाटील, आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

आ. कैलास पाटील म्हणाले की, या संमेलनाच्या माध्यमातून विशाल शिंगाडे यांनी स्थानिक कलाकारांना व त्यांच्या कलेला वाव दिला. तसेच जिल्ह्याला राष्ट्रीय पारितोषिक पटकावून आपला जिल्हा कशात ही मागे नाही हे दाखवून देण्याचे काम केले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच मराठी नाट्य परिषदेला जागा उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित पाठपुरावा करून ती उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. प्रास्ताविक धनंजय शिंगाडे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल शिंगाडे यांनी व उपस्थितांचे आभार राजेंद्र अत्रे यांनी मानले. या कार्यक्रमास कलाकार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top