उमरगा(प्रतिनिधी)- मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आठ महिन्यातच दुर्घटनाग्रस्त झाला या दुर्घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी व यासाठी जबाबदार असणाऱ्या दोषींना कठोर शासन करण्यात यावे तसेच  याच ठिकाणी लवकरात लवकर महाराजांचे स्मारक ब पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी उमरगा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट ) यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करत तहसीलदारांना दि .29 रोजी निवेदन देण्यात आले . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती .

तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,   हे अत्यंत वेदनादायी अन्‌‍ मनाला संताप आणणारे आहे. केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यभरात  युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दुर्घटनेतील दोषींविरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष तथा भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आणि दैदीप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा उभारावा . यावर त्वरित कार्यवाही नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे .

या आंदोलनात प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शंतनू सगर , तालुका सरचिटणीस धीरज बेळंबकर, युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे, सरपंच श्रीराम जगदाळे, नंदू भोसले ,प्रताप महाराज ,यशवंत जाधव, आनंद पाटील, आदी सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top