धाराशिव (प्रतिनिधी)- आदिवासी पारधी समाजातील कुटुंबाना शबरी घरकुल योजनेतून घरकुल उभारण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी याकरिता मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांनी केले.
शबरी घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षात आदिवासी समाजाकरिता मंजूर झालेल्या हक्काच्या घरकुलांचे लोकार्पण सोमवार, दि.26 ऑगस्ट रोजी पापनास नगर धाराशिव येथे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूरचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे, शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कोंढारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ.ओंम्बासे म्हणाले की, बहुतांश पारधी समाज हा गायरान जमिनीवर वास्तव्य करत आहे. यापूर्वी या जमिनी नियमानुकूल करुन वैयक्तिक मालकी देण्यात येत होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोणतीही शासकीय जमिनी वैयक्तिक लाभार्थ्यास देणे बंद झाले. तरीही शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत गावालगत असलेली शेतकऱ्याची जमीन शासनाला विक्री करण्याची तयारी असल्यास ती जमीन खरेदी करुन त्यावर घरकुल बांधता येतील.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूरचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे यांचे भाषण झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार डॉ.मैनाक घोष यांनी आदिवासी पारधी समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व विभागातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
प्रारंभी प्रातिनिधीक स्वरुपात सुरेश चंदू काळे या लाभार्थ्याच्या घरकुलाचे लोकार्पण करुन उर्वरित लाभार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले. आभार सुनील काळे यांनी मानले. कार्यक्रमास पारधी वस्तीमधील घरकुल योजनेचे लाभार्थी, महिला, पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.