धाराशिव (प्रतिनिधी)-भारता शेजारील बांगलादेशात काही दिवसापूर्वी निर्माण झालेल्या अस्थिरतेमध्ये अनेक हिंदू कुटुंबांना अन्याय अत्याचाराला बळी पडावे लागले त्यातून अनेक निष्पाप लोकांच्या हत्या झाल्या अनेकांची घरे उध्वस्त झाली संसार उघड्यावर आले ,या बांगलादेशी हिंदूंच्या बाबतीत भारतातील हिंदूंमध्ये निर्माण झालेला असंतोष व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने 28 ऑगस्ट रोजी धाराशिव शहरात हिंदू रौद्र मोर्चाचे  आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सकल हिंदू समाजाचे प्रतिनिधी ॲड. विक्रम साळुंखे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुढे असे सांगितले की हिंदू समाजाच्या या भीषण परिस्थितीबद्दल भारतीयांच्या मनात असलेला असंतोष संघटित करून त्याला रस्त्यावर उतरवण्याचे आवाहन हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाच्या रूपाने करण्यात आले आहे. धाराशिव शहरात 28 ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी दहा वाजता राजमाता जिजाऊ यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून धाराशिव शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून या निवेदनाद्वारे बांगलादेशातील हिंदूंचे पुनर्वसन करावे आणि हिंदूवरील अत्याचाराला बळी पडलेल्या नागरिकांच्या पाठीशी भारत सरकारने उभे राहावे यासाठी दबाव आणावा या हेतूने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात धाराशिव शहर आणि परिसरातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ,असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 
Top