धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या वास्तव्याने पावन झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील महामार्गाच्या प्रलंबित कामासाठी भाजपा सरकारने 220 कोटीचा निधी मंजूर करून या कामाचा भूमिपूजन सोहळा ऑनलाइन पद्धतीने केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी केला होता. सातत्याने मागणी होत असलेल्या सर्विस रोडच्या कामाची सुरुवात झालेली आहे काम चालू असताना त्याची पाहणी भारतीय जनता पार्टीचे मा. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी आज केली.

या पाहणी दरम्यान बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यातील कार्यसम्राट आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व मा. आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या सहकार्यातून जिल्ह्यातील रस्त्यासाठी एवढा भरघोस निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळाला असून या कामाची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आपले सरकार हे सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारे सरकार असून राज्यातील महायुतीचे सरकार व केंद्र सरकार यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. परंतु केंद्र व राज्य सरकार जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देवून विकासात्मक कामे मार्गी लावत असताना विरोधक मात्र श्रेय वादासाठी पुढे सरसावतात न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी त्यांची सततची धडपड असते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यासाठी कोणतेही विकासात्मक धोरण आखले नाही. परंतु महायुती सरकारच्या केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी जिल्ह्यातील विरोधक हे अग्रेसर असतात. शहरातील डी. मार्ट समोरील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या सर्विस रोडमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. अनेकांची जीवित व वित्तहानी झाली. परंतु हे सुरू झालेले काम लवकरच पूर्ण होईल व जिल्हा वासियांसह महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या सर्विस रोडमुळे मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त करून जिल्ह्याच्या व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे करता येईल ते सर्व आपण महायुतीच्या माध्यमातून पूर्ण करू अशी ग्वाही श्री. नितीन काळे यांनी यावेळी दिली.

 
Top