तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रारूप विकास आराखड्यावरून मागील कांही महिन्यांपासून चांगलाच गदरोळ सुरू आहे. यापूर्वीच्या आराखड्याच्या प्लॅन बी बाबत नागरीकांच्या सूचना व आक्षेप मागविल्यानंतर यानुसार अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले होते. त्यानुसार समितीने आपला अहवाल नुकताच सादर केला असून यामध्ये प्रारूप विकास आराखड्यातील प्लॅन बी मधील 51 शक्तीपीठ, रामदला तलावातील टीपी स्कीम, फनी-क्युलर ट्रेन आदी प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. भाविकांना मंदिरात येण्या जाण्यासाठी महाद्वारमधूनच रस्ता ठेवण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे या अहवालावर आता मंदिर संस्थान समिती कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांचे गर्दीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करणे अत्यावश्यक असल्याने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर या राज्य संरक्षीत स्मारकाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. कामाकरीता तज्ञ वास्तुविशारद सल्लागार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार वास्तुविशारद सल्लागार यांनी सर्व बाबींचा अभ्यास पूर्ण करुन सर्वंकष विकास आराखडा तयार केलेला आहे. या विकास आराखड्याबाबत तुळजापूर शहरातील नागरीक, भाविक, स्थानिक, पुजारी मंडळ, महंत, विविध शासकीय यंत्रणा यांच्या सुचना व हरकती मागवल्या होत्या. या प्राप्त सूचना व हरकतींच्या तांत्रिक बाबी तपासून मंदिर संस्थानला अहवाल सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी अपर यांच्या अध्यक्षतेखाली 20 सदस्यीय समिती गठित केली होती. या विकास आराखड्यासंदर्भात एकूण 2034 सूचना प्राप्त झाल्या होत्या. याबाबत अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 25 जुलै 2024 रोजी बैठक पार पडली. प्रारुप विकास आराखड्यावर भाविक नागरीकांकडून प्राप्त सुचनावर प्रवेश व बाहेर पडणे महाद्वारमधूनच रहावे.
तांत्रिक व प्रशासकीय विभागाकडून प्राप्त अभिप्राय विचारात घेवून जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष यांना या समितीने आपला अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात प्रस्तावित आराखड्यामधील आराधवाडी भागात प्लॅन बी प्रमाणे होणारी कामे ज्यामध्ये 108 फुटी भवानी तलवार देखावा, ऐतिहासीक मराठा साम्राज्य देखावा, लेजर शो, बोटीग, 51 शक्तीपीठे, फनी क्युलर ट्रेन, रामदरा तलावाखालील 200 एकर मधील टी पी स्कीम, आराधवाडी येथील वाहनतळ, भाविकांसाठी वेटींग रूम, आराधवाडी येथे होणाऱ्या विकास कामांबाबत नागरिकांनी आक्षेप व सूचना दाखल केल्या होत्या. त्या सर्व सूचनांचा विचार करुन डी. पी. आर संदर्भात गठीत समीतीने अभिप्राय दिले आहेत.