धाराशिव (प्रतिनिधी)-   कापूस व सोयाबीन उत्पादकांना ई पीक पाहणीची अट रद्द करुन शेतकऱ्यांना सरसगट अनुदान देण्यात यावे, तसेच सोयाबीन, मुग, उडीद हमीभाव खरेदी केंद्र चालु करण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी शुक्रवारी (दि.16) जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

कृषी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले की, सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलद्वारे सोयाबीन व कापूस लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्या करीता पात्र रहातील ही अट रद्द करुन सात-बारावर पीक पेयात सोयाबीन व कापसाची नोंद ग्राह्य धरुन सोयाबीनचे अनुदान देण्यात यावे. शासनाने पोर्टलद्वारे नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामस्तरावर लावलेल्या आहेत त्यामध्ये दुरुस्ती करुन शेतकऱ्यांना सरसगट अनुदान देण्यात यावे. केंद्र व राज्य सरकारच्या आयात व निर्यात धोरणामुळे शेतकयांनी पीकविलेल्या सोयाबीनला शासनाने रुपये 4892 एमएसपी घोषीत केलेली असताना गेले दोन वर्ष सोयाबीनचा भाव रुपये 4 हजार ते 4300 थांबला आहे. यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन पिकामध्ये एकरी रुपये 25 ते 30 हजार रुपयाचे नुसान मागील तीन वषार्पासून होत असल्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. यापुढील काळामध्ये सोयाबीन डीओसी व खाद्यतेलाची आयात थांबवावी. त्याचप्रमाणे येत्या हंगामात येऊ घातलेले सोयाबीन रुपये 4 हजारप्रमाणे खरेदी केले जाईल, अशी भिती व्यापायांमार्फत व्यक्त होत आहे. त्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर सोयाबीन, उडीद व मुगासाठी हमीभाव खरेदी केंद्र प्रत्येक महसूल मंडळात एक या प्रमाणे लवकरात लवकर सुरु करावे ज्यामुळे शेतकयांचे मुख्य पीक असणाऱ्या सोयाबीनचे दर पडणार नाहीत. या मागण्याचा प्रामुख्याने विचार करुन धाराशिव जिल्ह्यातील आर्थीक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सन 2023 चे सोयाबीन अनुदान सरसगट द्यावे व सोयाबीन खरेदी केंद्र चालु करणेबाबत आदेशीत करावे, या मागण्या मान्य न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दुधगावकर यांनी निवेदनात दिला आहे.

 
Top