धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या.

जिल्हास्तर/तालुकास्तर शालेय योगासन,फुटबॉल,क्रिकेट,बॅडमिंटन, कुस्ती,व्हॉलीबॉल इ.स्पर्धेचे व जिल्हास्तर शालेय हॉकी व नेहरु हॉकी,ज्युदो,बुध्दीबळ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.तसेच श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव या ठिकाणी लहान मुलांच्या लिंबू चमचा शर्यत,दोरी उड्या स्पर्धा, 40 ते 60 वर्षापर्यंतच्या नागरिकाच्या चालणे,जलद चालणे,धावणे कॅरम, तायक्वांदो, हॉकी (पेनल्टी शुटआऊट) इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

क्रीडा भारती व विविध एकविध क्रीडा संघटना आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने खेळाचे महत्व व त्यामधील संधी या विषयासह राष्ट्रीय क्रीडा दिन का साजरा करण्यात येतो, याचे महत्व व  खेळाचे महत्व याविषयी क्रीडा भारतीचे मिलींद डांगे यांनी माहिती दिली.क्रीडा भारतीचे राजेंद्र कुलकर्णी यांनीही खेळाचे महत्व विषद करुन त्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये संधी मिळतात,याबद्दल माहिती दिली. यावेळी सर्व मान्यवर यांचे हस्ते विविध स्पर्धेत प्राविण्य संपादन करणाऱ्या खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

29 ऑगस्ट 2024 रोजी अभिनव इंग्लिश स्कुल येथे क्रीडा दिनाचा मुख्य कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले.

यावेळी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी अकुंश पाटील व राजकुमार सोमवंशी तसेच नायब तहसिलदार घृष्णेश्वर स्वामी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सतिश मोदानी (अध्यक्ष,राजस्थानी बहुउद्देशिय संस्था,धाराशिव) व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी अकुंश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांच्या कार्याविषयीची व जीवनामध्ये खेळाचे महत्व याची माहिती दिली.

शाळेतील राज्य स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विविध स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.अभिनव इंग्लिश स्कुल,धाराशिवच्या प्राचार्या प्रतिभा सतिश मोदाणी यांनी खेळाडूंना बहुमोल असे मार्गदर्शन केले.आभार क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी मानले.

 
Top