धाराशिव (प्रतिनिधी) - झाडे लावून फोटो काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे. ती लावलेली जगली आहेत किंवा नाहीत ? याकडे कोणी ढुंकून देखील पाहत नाहीत. मात्र 80 वर्षीय पाशामियाँ पठाण यांनी 25 वर्षापूर्वी दगडाच्या खदानीमध्ये मातीचा एक कण नसताना स्वतः माती विकत घेऊन त्या ठिकाणी वृक्ष लागून ती जगवून त्याचे नंदन वनात रूपांतर केले आहे. त्यामुळे झाडे लावण्यापेक्षा झाडे जगविणे आवश्यक असून ती जगवायची कशी ? याचा आदर्श शेख यांनी घालून दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावण्यापेक्षा ती जगवावीत असे आवाहन आ कैलास पाटील यांनी दि.15 ऑगस्ट रोजी केले.
धाराशिव शहरातील एकता नगर भागातील बिस्मिल्लाह गार्डन येथे आ पाटील यांनी भेट देऊन या बागेची पाहणी करीत वृक्ष लागवड केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाशामियाँ शेख, माजी नगराध्यक्ष मैनोद्दीन पठाण, शिवसेना शहर प्रमुख सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक गणेश खोचरे, गफार शेख, आयुब शेख आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की, पाशामियाँ शेख यांनी फक्त वृक्ष लावलीच नाही तर ती जगवून दाखवली आहेत. देशात देखील दरवर्षी कोट्यवधी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जातो. मात्र ती प्रत्यक्षात जगविली जात नाहीत. त्यामुळे झाडे लावण्यापेक्षा ही जगविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पठाण यांनी त्यांच्या कामातून दाखवून दिले आहे. शेख यांनी....देश के नाम, दो झाड... असा संदेश दिला असून त्यांचे काम निश्चितच तरुणांना लाजवेल असे आहे. त्यामुळे प्रत्येकाने दोन झाडे लावून ती जगविली तर पुढील पिढीला नक्की प्रेरणा निर्माण होईल असे त्यांनी सांगितले.