धाराशिव (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रातील 60 वर्षावरील प्रत्येक शेतकऱ्यांना दरमहा किमान 5 हजार रुपये पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड. रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
एकीकडे सार्वजनिक क्षेत्रात बोनसचा कायदा लागू झालेला असला तरी शेतकऱ्यांनी मात्र बोनस कधी पाहिलेलाच नाही. वर्षानुवर्षे जमिनीमध्ये गाळलेला घाम. केलेले श्रम व आठवलेले रक्त यांचे मूल्य शेतकऱ्यांच्या पेन्शनच्या मागणीच्या दहा पटीने नाहीतर शंभर पटीने जास्त आहे. सार्वजनिक क्षेत्रातील शिपायाचा पगारही वीस हजाराहून जास्त आहे.
शेतकऱ्यांची अवस्था जाणून आज देशातील अनेक राज्यांनी शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू ,पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम,ओरिसा व उत्तर प्रदेश या राज्यात शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू केली आहे. आयुष्यभर काबाडकष्ट करून देशातील नागरिकांना जगविणाऱ्या बळीराजाला पेन्शन देण्यास आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने चालढकल केली आहे. देशातील शेतकरी सोडून इतर कोणताही घटक आत्महत्येकडे वळलेला नाही. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा दुष्परिणाम म्हणूनच गेल्या अनेक वर्षात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून सततच्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी व आत्महत्या पासून परावर्त करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना प्रति महिना पाच हजार रुपये पेन्शन देऊन आपण व्यापाऱ्यांचे हित जोपासणे ऐवजी शेतकऱ्यांच्या हितालाही प्राधान्य देत असल्याचे दाखवून द्यावे असे स्पष्ट मतही ॲड भोसले व्यक्त केले.