धाराशिव (प्रतिनिधी) - लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा प्रकल्प माकणी या धरणावर 23 गावांना हक्काचे पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी 2004 पासून केवळ आश्वासनावरच झुलविण्याचे काम या भागातील शेतकरी व नागरिकांना आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधी व सरकारने केले आहे. हा दुष्काळी पट्टा असल्यामुळे प्राधान्याने त्यासाठी आवश्यक असलेला 113 कोटींचा निधी मंजूर करून येत्या मार्चपूर्वी हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा या गावातील सर्व शेतकरी व नागरिक आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्वाणीचा इशारा तेरणा निम्न प्रकल्प संघर्ष समितीचे जगदीश पाटील यांनी दि.22 ऑगस्ट रोजी दिला.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तेरणा निम्न संघर्ष समितीचे गुंडाप्पा गाजरे, गौतम क्षीरसागर, अमर माने कालिदास गायकवाड, दीपक सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, माकणी येथील प्रकल्प करण्यासाठी 1993 साली या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने अधिगृहीत केलेल्या आहेत. तर या प्रकल्पाचे काम 2004 साली पूर्ण झालेले आहे. या धरणावरून 23 गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला हक्काचे पाणी देणे आवश्यक आहे. शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून तांत्रिक मान्यता दिली आहे असे म्हणून जुळविले जात आहे. मात्र निधीसाठी ही फाईल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या केबिनमध्ये धुळखात पडून असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे धाराशिव तालुक्यातील 21 गावे लोहारा तालुक्यातील दोन गावे अशा 23 गावातील 6 हजार 890 हेक्टर जमिनीला सिंचन योजनेचा लाभ होणार आहे. यावेळी अश्विन पाटील, सुधीर गायकवाड, नागनाथ बोरगावकर, मल्लिनाथ बनसोडे, संतोष पाटील, अमोल पाटील, नेताजी पाटील, अण्णासाहेब क्षिरसागर, बाळासाहेब पाटील, मनोज मोठे, शाहुराज मोठे यांच्यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय दबाव
यावेळी जगदीश पाटील यांनी औसाचे आमदार यांचा राजकीय दबाव असल्यामुळे निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्पातील पाणी आपल्याला मिळत नाही. असा स्पष्ट आरोपही जगदीश पाटील यांनी केला. त्यांना हे पाणी औसा तालुक्यातील एमआयडीसीला मिळावे असे वाटते.