धाराशिव (प्रतिनिधी)-“ ग्रीन मराठवाडा इनिशिएटिव्ह“ या मोहिमे अंतर्गत वृक्षवल्ली परोपकाय फलांती वृक्षा हे ब्रीद घेऊन संपूर्ण मराठवाडा हरित करण्याचा जो मानस आहे , या अंतर्गत येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आंबा वृक्षाची लागवड करण्यात आली. संतोष सिंग यांच्या पुढाकाराने ग्रीन मराठवाडा या संकल्पनेसाठी एम एस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय, लातूर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव व श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथील माजी विद्यार्थी दरवर्षी नवीन संकल्पना घेऊन मराठवाड्याच्या हरित क्रांतीसाठी प्रयत्न करत आहेत. याचाच  भाग म्हणून पंधरा दिवसांमध्ये  तुळजापूर येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, नवोदय विद्यालय, श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय व तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव येथे दोन हजार केशर आंब्याची लागवड करण्यात आली.

यावेळी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, पर्यावरण प्रेमी चळवळीच्या कार्यकर्त्याअर्चना नलावडे-शितोळे , यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, ग्रीन मराठवाडा या मोहिमेअंतर्गत संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड मोहीम सुरू असून या मोहिमेअंतर्गत वृक्ष वाटप सुरू असून अनेकांनी या योजनेचा फायदा घेऊन आपला परिसर हरित करण्यासाठी वृक्षांची लागवड केलेली आहे.

 परंतु वृक्ष लागवड करून आपली जबाबदारी संपत नाही तर वृक्ष संवर्धन करून त्याचे संगोपन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 वृक्षाची लागवड करणे ही मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.  हीच भूमिका लक्षात घेऊन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर भविष्यामध्ये  हरित व्हावा म्हणून आम्ही या मोहिमेअंतर्गत आंब्याचे झाड लावलेले आहेत.  नजीकच्या काळात नक्कीच हा परिसर हिरवागार होऊन  या आंब्याच्या झाडाचा उपयोग  सावलीसाठी आणि फळासाठी होणार आहे. यावेळी बोलताना अर्चना नलावडे- शितोळे म्हणाल्या की  इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक गोष्ट , प्रत्येक काम होऊ शकते.  मराठवाड्यामध्ये वृक्ष लागवड करणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी आणि या भागातील सर्वांनी वृक्ष लागवड करून संवर्धनाची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली पाहिजे. यावेळी विद्यार्थी, स्टाफ यांनी वृक्षाची लागवड केली. वृक्षलागवडीसाठी मंजुषा नलावडे, प्रा.सुनिता गुंजाळ, प्रा.अस्मिता कांबळे,उषा येरकळ, डॉ प्रीती माने, सविता नलावडे, प्रा ज्ञानराज निंबाळकर, वॉर्डन सरला पाटील यांची उपस्थिती होती.

 
Top