कळंब (प्रतिनिधी)- आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन करून वारी घडलेले लाखो वारकरी द्वादशीला परतीच्या प्रवासाला लागतात. या वारकऱ्यांची परत कोणी सेवा करत नाही. कळंब येथील स्व. गणपतराव कथले आघाडी मात्र आषाढीच्या दुसर्या दिवशी अन्नछत्र सुरू करत वारकऱ्यांना भोजन उपलब्ध करून देते. गुरुवारी याठिकाणी 70 हजारावर वारकऱ्यांनी भोजन घेतले. याकामी स्वयंसेवक अहोरात्र राबले.
विदर्भातील सर्व जिल्हे, मध्यप्रदेशातील काही जिल्हे यासह परभणी, हिंगोली, जालना आदी गोदावरी खोऱ्यातील अनेक तालुक्यातील लाखो वारकरी दिंडी व पालखी सोहळ्यात पायी वारी करतात. याशिवाय आषाढी एकादशीपुर्व एक दिवस आधी वाहनांने पंढरी गाठणारांची संख्याही तितकीच असते.
लाखोंच्या संख्येतील हे वैष्णवजन आपल्या आराध्य दैवत विठ्ठलाचे दर्शन घेवून एकादशीच्या मध्यरात्रीनंतर परतीच्या प्रवासाला लागते. यांचा शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग हा परतीचा रस्ता असतो. याच रस्त्यावरील कळंब ओलांडले की विविध रस्त्याने वारकरी वेगवेगळ्या जिल्ह्यातील आपल्या गावात पोहचतात.
दिंड्या पंढरीकडे कूच करत असताना जागोजागी पंगती, अन्नदान असते. परतीच्या प्रवासात मात्र अशी सोय नसते. शिवाय एकाचवेळी रस्त्यावर वर्दळ वाढलेली असल्याने हॉटेलात पाय ठेवायला जागा नसते. यामुळे शेपाचशे किलोमीटरचा प्रवास करून घरी गेल्यावरच द्वादश सोडण्याची वेळ येते. यामुळेच कळंब येथील स्व. गणपतराव कथले युवक आघाडीने कळंब येथील बसस्थानकावरच्या रिकाम्या जागेत परतीच्या मार्गावर असलेल्या वारकऱ्यांसाठी अन्नछत्र सुरू करण्याचा पायंडा केला.
गुरूवारी या अन्नछत्रात 70 हजारांपेक्षा जास्त वारकर्यांनी अन्नसेवेचा लाभ घेतला. यासाठी कथले आघाडीच्या सदस्यासह विविध स्तरातील शेकडो स्वयंसेवक जाती धर्माच्या भिंती भेदत या सेवाकार्यात सहभागी झाले होते. परतीच्या वारकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या स्व. गणपतराव कथले युवक आघाडीच्या या अन्नछत्राचे यंदाचे हे सहावे वर्ष होते. बुधवारी मध्यरात्री दोन वाजता स्वयंपाकघरात सात भट्ट्यावर स्वयंपाक सुरू झाला, तो शुक्रावारी रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होता. पन्नासपेक्षा जास्त महिला पुरी, चपाती लाटण्याचे काम करत होत्या. शिवाजी शिरसाठ यांच्यासह चारपाच व्यक्तिंनी आचारी सेवा बजावली. शंभरच्या आसपास स्वयंसेवक किचनमध्ये सेवेत होते.
शेकडो हात वारकऱ्यांसाठी राबत होते. स्वयंपाक करणे, त्याची वाढ कपने, रिकामी ताटे उचलणे, ती धुणे याकामी विविध स्तरातील कळंबकर सहभागी झाले होते असे बाळासाहेब कथले यांनी सांगितले. यावेळी संजय देवडा,अतुल गायकवाड,बालाजी आडसुळ,संजय घुले, ज्योती सपाटे, शकुंतला फाटक,नाना जोशी,अनिल हजारे दत्ता भाऊ कवडे,सतपाल बनसोडे,सागर बाराते,राजेंद्र बिक्कड,डॉ गोविंद जोगदंड,संताजी विर,अशोक चिंचोले,डॉ निळकंठ चोपणे व कथले युवक आघाडी चे बाळासाहेब कथले,सुमीत बलदोटा, शितलकुमार घोंगडे,दत्ता तनपुरे,शाम जाधवर,, उदयचंद्र खंडागळे,गजानन फाटक,यश सुराणा, सागर भंडगे भाऊसाहेब शिंदे, सुशील बलदोटा ,अशोक फल्ले, गोवींद खंडेलवाल धर्मराज पुरी,विश्वजीत पुरी नवनाथ पुरी भागवत किर्वे, राहुल किरवे,संतोष काळे व आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते
मेन्यूत चपाती, पुरी, भात, हिरव्या मिरच्यांचा ठेचा, जिलेबी, केळी या पदार्थाचा समावेश होता. शिवाय 800 जार थंड पाणी वापरात आले.
या अन्नछत्रात 10 क्विंटलचा तांदुळ, 700 किलोचे गव्हाचे पीठ, 80 किलो मिरची, 400 किलो गोडेतेल, बटाटे, शेंगदाणे अशी मोठी सामग्री वापरात आली.
उपजिल्हा रुग्णालयाने याठिकाणी डॉक्टर कर्मचारी यांच्यासह रुग्णवाहिका सज्ज ठेवली होती.नगर परिषदेने परिसर निर्जंतुक करून घेतला, स्वच्छता गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या.