कळंब (प्रतिनिधी)- रोटरी व इनरव्हील परिवार कळंब सिटी पदग्रहण व कळंब भूषण पुरस्कार समारंभ दि. 21 जुलै रोजी महावीर भवन  येथे मोठ्या थाटात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ डॉ.जगन्नाथ दीक्षित, उपप्रांतपाल गणेश मुळे, कळंब भूषण पुरस्कार प्राप्त दिनेश वाघमारे  यांची प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. 

या वेळी नूतन अध्यक्ष म्हणून अरविंद शिंदे यांनी मावळते अध्यक्ष रवी नारकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर इनरव्हील क्लब नूतन अध्यक्ष प्रतिभा भवर यांनी मावळत्या अध्यक्ष डॉ. आकांक्षा पाटील यांच्याकडून तर नूतन सचिव म्हणून डॉ.  प्रियंका आडमुठे यांनी पदग्रहण केले.  रोटरी वर्षाच्या कार्याचा अहवाल अध्यक्ष रवी नारकर व सचिव डॉ. साजिद चाऊस यांनी तर इनरव्हील क्लबचा अहवाल डॉ. आकांक्षा पाटील यांनी मांडला. याप्रसंगी रोटरी क्लब कळंब सिटीच्या वतीने देण्यात येणारा कळंब भूषण पुरस्कार यावर्षी कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील रहिवाशी व पिंपरी चिंचवड येथील तरुण उद्योजक दिनेश सूर्यकांत वाघमारे यांचा 11 हजार रुपये रोख, सन्मानपत्र रोटरी सन्मान चिन्ह  देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व दीक्षित जीवनशैली यासाठी देश परदेशात प्रसिद्ध असलेले डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दीक्षित जीवनशैली बदलातून वेट लॉस व मधुमेह मुक्ती या विषयावर उद्बोधन केले.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देवडा, सुशील तीर्थकर, संजय घुले यांनी केले. तर आभार मावळते सचिव डॉ. साजिद चाऊस यांनी मानले. कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजीव तापडिया, पतंजली योग समितीचे योगशिक्षक शशिकुमार भातलवंडे,  या कार्यक्रमात रोटरी (पी. एच. एफ ) म्हणून प्राचार्य सुनील पवार, डॉ. अभिजीत जाधवर  यांचा सत्कार करण्यात आला. तर कार्यक्रमात रोटरीचे सचिव अशोक काटे यांच्या मातोश्री परिमाळा काटे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. त्याबद्दल रोटरी परिवारातर्फे कार्यक्रमात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 
Top