धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना म्हणून ओळख असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील महिला आता मोठ्या संख्येने पुढे येत आहे. या योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.दर महिन्याला 1500 रुपये पात्र महिला लाभार्थीच्या आधार सलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.त्यामुळे वर्षासाठी 18 हजार रुपये महिलेच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
जिल्ह्यातील 4 लाख 48 हजारापेक्षा जास्त पात्र महिलांना या या योजनेचा लाभ देण्याचे नियोजन आहे.19 जुलैपर्यंत ग्रामीण आणि शहरी भागातील 1 लाख 43 हजार 251 महिलांचे अर्ज प्राप्त झाले.यामध्ये ऑनलाईन अर्जाची संख्या 38 हजार 779 आणि 12 हजार 472 ऑफलाइन अर्जाचा समावेश आहे. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून तालुका समितीने ग्रामीण भागातील 59 हजार 994 अर्जाना मान्यता दिली आहे.
जिल्ह्यात एकूण 8 तालुक्यात भूम, कळंब, धाराशिव, तेर, तुळजापूर, उमरगा, आलूर, परंडा, लोहारा व वाशी येथे एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालय आहे.या कार्यालयअंतर्गत 1885 आणि धाराशिवसह नगरपालिका क्षेत्रात 167 अशा एकूण 2052 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहे.19 जुलैपर्यंत ग्रामीण भागातून 1 लाख 36 हजार 109 आणि शहरी भागातील 8142 महिलांचे असे एकूण 1 लाख 43 हजार 251 अर्ज प्राप्त झाले.यातील ग्रामीण भागातील 34 हजार 915 आणि शहरी भागातील 3864 अशी एकूण 38 हजार 779 महिलांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले.ग्रामीण भागातील 1 लाख 194 महिलांचे आणि शहरी भागातील 4472 महिलांचे असे एकूण 1 लाख 4 हजार 472 ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समितीने बाल विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या अर्जाला मान्यता दिली आहे,ती पुढीलप्रमाणे भूम- 9292,कळंब -12 हजार 146,धाराशिव व तेर -2904, तुळजापूर- 11 हजार 339, उमरगा व आलूर- 3 हजार, परंडा- 12 हजार 675, लोहारा- 2498 आणि वाशी- 6140 अशा एकूण 59 हजार 994 ग्रामीण महिलांच्या अर्जाना मान्यता दिली आहे.