धाराशिव  (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड व गजापूर येथे कट रचून धार्मिक स्थळ मज्जिद व अल्पसंख्यांक मुस्लिम लोकांवर हल्ला करणाऱ्या गुंडावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, संबंधित गुन्हेगारावर युएपीए कायद्या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींसह प्रधानमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि.19 जुलै रोजी केली आहे.

दिलेल्या नियोजनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि.14 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड व गजापूर येथे काही जातीयवादी लोकांनी मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या दर्गाह, मज्जिद व निष्पाप मुस्लिम समाजातील लोकांवर विशेष करून महिलांवर भ्याड हल्ला केला आहे. यामध्ये मज्जिद व मुस्लिम लोकांच्या घराचे तसे दुकानाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. विशाळगड येथील हजरत मलिक रेहान दर्गाह हे सर्व धर्मीयांचे पवित्र स्थान असून या दर्गाहवर हिंदू व मुस्लिम भाविकांची निस्सीम भक्ती आहे. या गडावरील काही घरे व दुकानांचे अतिक्रमण याबाबतचा विषय उच्च न्यायालय प्रलंबित असून ती अतिक्रमणे काढण्यासाठी न्यायालयाने स्थगिती दिलेले आहे. मात्र काही दंगेखोरांनी विशाळगडाहून गजापूरमध्ये येणाऱ्या मुस्लिम लोकांवर भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात काही मुस्लिम गंभीर जखमी झाले असून साहित्याची लूट देखील केलेली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील या दर्गाहवर छोट्या तोफ सदृश्य यंत्राने फटाक्याचा बॉम्ब फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही जातीयवादी तरुणांनी केला होता. त्याच शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आठ जुलै रोजी विशाळगडावर महाआरतीचे नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिंदे यांनी दर्गाह व मुस्लिम समाज यांच्या विरोधात चितावणीखोर भाषण दिले होते. तसेच माजी खासदार छत्रपती संभाजी यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. विशेष म्हणजे राज्यातील मुख्यमंत्री गृहमंत्री व सत्तेतील आमदार खासदार हे नेहमीच मुस्लिम समुदायाच्या विरोधात भडकाऊ भाषण करीत आहेत. मुस्लिमांवर हल्ला करण्याच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य ओळखून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. संबंधित हल्ले कडक कारवाई करण्यात यावी, संबंधित निष्क्रिय व कर्तव्यात कसूर करणारे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे. केलेल्या हल्ल्यांमध्ये धार्मिक स्थळे व मुस्लिम समाजाच्या घरांची झालेली नुकसान भरपाई शासनाने द्यावी. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी 5 लाख रुपये सरकारने द्यावेत. मुस्लिम समाजाला संरक्षण देण्यासाठी त्वरित विशेष अधिवेशन बोलावून तत्काळ कायदे पारित करण्यात यावेत व या सर्व घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी आदी मागण्या केल्या आहेत. या निवेदनावर एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष सिद्दीक इब्राहिम बौडीवाले उर्फ गोलाभाई, माजी जिल्हाध्यक्ष मुस्तफा खान, धाराशिव तालुकाध्यक्ष मोहसीन शेख

 आदींसह इतर समाज बांधवांच्या सह्या आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी या घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

 
Top