धाराशिव (प्रतिनिधी)-विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये असलेल्या मुस्लिम वस्तीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करुन हल्लखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रिपाइंचे धाराशिव जिल्हाध्यक्ष रवि माळाळे यांच्या नेतृत्त्वाखालील शुक्रवारी (दि.19) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, विशाळगडावर आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामध्य हिंसाचाराची घटना घडली. सदरील ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यासाठी जे लोक विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामध्ये आले होते. त्यांनी तिथल्या जवळच्या गावात जाऊन मुस्लिम वस्तीवर हल्ला केला. घराची नासधूस, तिजोऱ्या फोडणे असे प्रकार या वस्त्यांमध्ये घडले आहेत. या घटनेचा रिपाइं (आ) च्या वतीने निषेध करण्यात येत आहे. सदर घटनेतील आरोपीस तात्काळ अटक करुन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींची निःपक्षपणे सखोल चौकशी करुन पीडित कुटुंबांना न्याय द्यावा. आरोपींवर कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर रिपाइं जिल्हाध्यक्ष रवि माळाळे, मराठवाडा उपाध्यक्ष पोपट लांडगे, ज्योती लोखंडे, मयुर अंकुश, अक्षय कदम, मोमीन तांबोळी, योगेश बनसोडे, सागर माळाळे आदींची स्वाक्षरी आहे.