धाराशिव (प्रतिनिधी)- येथे झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा मराठी भाषेतील ख्यातनाम साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या सभागृहात मसापच्या वतीने शनिवारी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिब्रितो यांच्या आठवणींना उजाळा दिला.

ख्रिस्त धर्माचे धर्मगुरू म्हणून संमेलन अध्यक्ष दिब्रिटो यांना काही समाजकंटकांकडून विरोध करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर मोठे ताण-तणाव निर्माण झाले होते. अशा परिस्थितीतही धाराशिव येथे संमेलनाच्या उद्घाटनाला फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे अध्यक्षीय भाषण ऐकण्यासाठी ज्या संख्येने धाराशिव शहर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते, ते पाहता दिब्रिटो यांच्या साहित्यिक योगदानाचा तो सर्वोच्च सन्मान होता अशा शब्दात पत्रकार रवींद्र केसकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मसापचे अध्यक्ष तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी संमेलन अध्यक्ष म्हणून दिब्रिटो यांच्या निवडीपासून संमेलनाच्या समारोपापर्यंत त्यांच्या सहवासातून आलेल्या अनेक आठवणी यावेळी विशद केल्या. त्यांच्यातील साधेपणा आणि मानवी मूल्यांबद्दल असलेला कळवळा अंगीकारण्याजोगा असल्याचे तावडे यांनी नमूद केले. प्रा. महेंद्र चंदनशिवे यांनीही ख्रिस्त-मराठी साहित्यात दिब्रिटो यांचे योगदान शब्दातीत असल्याचे सांगितले. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनीही यावेळी शब्दसुमनांजली अर्पण केली. केवळ धर्म, जात या गोष्टीवरून व्यक्तीचे मूल्यमापन न करता त्याच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख पाहायला हवा. आणि दिब्रिटो यांनी मराठी साहित्यात दिलेले योगदान खूप मोलाचे आहे. म्हणूनच त्यांना साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र शासनानेही साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित केले असल्याचे देशमुख यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्राध्यापक अरविंद हंबरगेेकर यांनी मानले यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top