धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तींना उद्योग उभारणीतून स्वावलंबी करण्यासाठी आणि या उद्योगातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करावी.मराठा उद्योजक तयार होण्यास बँकांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) श्री. नरेंद्र पाटील यांनी केले. 

आज 4 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महामंडळाच्या योजनांचा आढावा घेताना श्री.पाटील बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास,प्रभारी जिल्हा उपनिबंधक बालाजी काळे व महामंडळाचे विभागीय अधिकारी प्रवीण पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री पाटील पुढे म्हणाले की,बँकांनी त्यांच्या शाखांना महामंडळाच्या योजनांची माहिती द्यावी. त्यामुळे जास्तीत जास्त कर्ज प्रकरणे मंजूर करता येईल. बँकांनी त्यांच्या शाखानिहाय महामंडळाच्या कर्ज प्रकरणांचे रजिस्टर ठेवावे.त्यामुळे प्रलंबित प्रकरणात कर्ज लवकर उपलब्ध करून देता येईल. महामंडळाच्या योजनेतून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देऊन व्याज परतावा वेळेत देता येईल.बँकांनी कर्ज उपलब्ध करून दिल्यानंतरच महामंडळ बँकांना व्याज परतावा देईल असे ते म्हणाले.

राष्ट्रीयकृत बँका अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास उदासीन असल्याचे सांगून श्री.पाटील म्हणाले की, या बँकांनी लाभार्थ्यांकडे सकारात्मक दृष्टीने बघणे आवश्यक आहे. ग्राहक व बँकांमध्ये एकमेकांप्रती विश्वास निर्माण झाला पाहिजे. सहकारी बँकांनी तारण न घेता महामंडळाच्या लाभार्थ्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे. महामंडळाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांमध्ये जनजागृती करावी.महामंडळ लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक तालुक्यात 1000 लाभार्थ्याला महामंडळाच्या योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. सहकारी बँकांनी महामंडळाच्या योजनांना कर्ज उपलब्ध करून देण्यास चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल श्री.पाटील यांनी संबंधित बँकांचे अभिनंदन केले. 

जिल्ह्यात महामंडळाअंतर्गत 4153 लाभार्थ्यांचे बँकांनी कर्ज मंजूर करून 318 कोटी रुपये रक्कम वितरित केली.महामंडळाने आजपर्यंत जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा 37 कोटी रुपयांचा व्याज परतावा केला आहे. सध्या महामंडळाकडून व्याज परतावा सुरू असलेल्या लाभार्थ्यांची संख्या 3804 इतकी आहे.

जिल्ह्यातील 30 राष्ट्रीयकृत,सहकारी, ग्रामीण व खाजगी बँकांच्या 122 शाखांकडून 4153 लाभार्थ्यांची महामंडळाची कर्ज प्रकरणी मंजूर केली. 346 प्रकरणे बँकांकडे प्रलंबित आहे.235 कर्ज प्रकरणात लाभार्थ्यांना बँकांनी प्रतिसाद दिला नसल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक अर्जुन बारंगुळे यांनी दिली.

आढावा सभेला विविध बँकांचे जिल्हा समन्वयक व शाखा व्यवस्थापक तसेच काही बँकांचे जिल्हा समन्वयक व शाखा व्यवस्थापक ऑनलाईन सहभागी होते.यावेळी त्यांनी महामंडळाअंतर्गत कर्ज प्रकरणांची माहिती दिली.

महामंडळाचे अध्यक्ष श्री.नरेंद्र पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तेरखेडा येथील श्रीकांत पौड व नानजवाडी येथील आकाश फाळके या लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनेतून घेतलेल्या नवीन वाहनाच्या चाव्या हस्तांतरित केल्या.

 
Top