पुणे (प्रतिनिधी)- संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन , पुणे  आयोजित दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलन 2024 अनुषंगाने संबंधित सहयोगी संस्थाची बैठक संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या अध्यक्षा प्राचार्या उल्काताई चंदनशिवे - धावारे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. या बैठकीत संत चोखामेळा महाराज व परिवारातील संताच्या साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन घेण्यासंदर्भात चर्चा होऊन तीर्थक्षेत्र पैठण या ठिकाणी हे साहित्य संमेलन घेण्याचे नियोजित करण्यात आले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून संत सोयराबाई यांच्या साहित्याचे अभ्यासक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे च्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

' मध्ययुगीन दलित संतकविता : सामाजिक व वाङ्मयीन मुल्यमापन ' या संशोधनपर  ग्रंथाद्वारे त्यांनी संत सोयराबाई सह चोखामेळा कुटूंबातील सदस्यासोबतच कान्होपात्रा सह अन्य वारकरी संतांच्या साहित्यकृतीचा संशोधनात्मक अभ्यास केला आहे. संत साहित्यात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. संदीप सांगळे हे शिक्षण प्रसारक मंडळाच्या तळेगांव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. संत साहित्य सोबतच सामाजिक व अन्य साहित्यकृती असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या प्रकाशित साहित्यकृती विविध पुरस्काराने सन्मानित आहेत. 

“ सोयराबाई : संत, कवी आणि माणूस “ असा मध्यवर्ती आशय घेऊन संपन्न होत असलेले दोन दिवसीय साहित्य संमेलन एकूण सहा सत्रात विभागून होणार असून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नामवंतांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र पैठण येथे शनिवार 28 व रविवार 29 सप्टेंबरला संपन्न होणार आहे. 

या साहित्य संमेलनात परिसंवाद, चर्चासत्र, संत साहित्य प्रदर्शन, उद्बबोधन व संत साहित्याचे देखावे असणार आहेत. याप्रसंगी संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील, अध्यासनाच्या अध्यक्षा  प्राचार्या उल्काताई चंदनशिवे, माजी खासदार प्रो सुनिलराव गायकवाड, वृंदावन फाऊंडेशन चे उपाध्यक्ष प्रा देवीदास बिनवडे, विश्वस्त प्रा. हभप प्रसाद महाराज माटे, हभप बाबूराव महाराज तांदळे, समता वारी मध्यवर्ती संयोजन समिती अध्यक्षा प्रा अलका सपकाळ, धोंडप्पा नंदे, श्रीमती राऊत ए.डी, हरीश भोसले, संमेलन संयोजन समितीचे महारुद्र जाधव, ज्ञानेश्वर वाघ, शंकरराव खामकर, लक्ष्मणराव चिलवंत, भिमा जाधव आदी उपस्थित होते.

 
Top