तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील जळकोटवाडी येथील तरुण शेतकरी राम जनार्धन बोबडे (वय 39) वर्ष यांनी सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय तोट्यात येत असल्यामुळे त्यास कंटाळून शेतातील पत्र्याच्या शेड मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि.6 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. 

मागील काही वर्षात राम बोबडे यांनी शेतात लाखो रुपये खर्च करून काकडी पीक घेतले होते. त्यात काकडीला दर न मिळाल्याने आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. दुग्ध व्यवसायासाठी लागणारा खर्च आणि नफा याचा ताळमेळ न लागल्याने शेती व्यवसायासाठी घेतलेले कर्ज वाढत असल्याने आर्थिक संकटाला कंटाळून स्वताः च्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आडुला गळफास लावुन आत्महत्या केली. मयत शेतकरी राम बोबडे याच्या पश्चात पत्नी, आई- वडील, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शेतकरी आत्महत्या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार राजेंद्र चौगुले व विक्रम सावंत यांनी पंचनामा केला. पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.

 
Top