तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात जे व्यक्ती प्रवेश करतील अशा व्यक्तीची नोंद नोंदवहीत गुरुवार दि. 18 जुलैपासुन घेण्यात येणार आहे.
या बाबतीत मंदीर प्रशासनाने दिलेल्या सुचनामध्ये म्हटले आहे की, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तुळजापूर यांनी श्री तुळजाभवानी देविजींच्या मुख्य गाभाऱ्यात जे व्यक्ती प्रवेश करतील अशा व्यक्तींच्या नोंदी नोंदवहीमध्ये घेणेबाबत कळविलेले आहे. त्यानुसार मंदिर प्रशासनाने चोपदार दरवाजा येथे सुरक्षा विभागामार्फत मुख्य गाभारा प्रवेश नोंदवही अद्यावत केली आहे. त्याप्रमाणे दिनांक 18 जुलैपासून श्रीदेविजींच्या मुख्य गाभाऱ्यात चरणतिर्थ पुजेपासून ते प्रक्षाळ पुजेपर्यंत (सिंहासन पुजा व अभिषेक पुजा कालावधी वगळता) जे व्यक्तीं श्रीदेविजींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतील अशा व्यक्तींनी मंदिर प्रशासनाच्या मुख्य गाभारा प्रवेश नोंदवहीमध्ये आपली नोंद करुनच गाभाऱ्यात प्रवेश करावा. अशी सुचना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक प्रशासन तथा तहसिलदार सोमनाथ वाडकर यांनी सांगितले आहे.