ढोकी (प्रतिनिधी) - महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षणच्या मुद्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठबळ देण्यासाठी व दि 10 जुलै रोजी धाराशिव येथे होणाऱ्या मराठा आरक्षण जागृती शांतता रॅलीच्या अनुषंगाने सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीने ढोकी येथे दि. 1 जुलै रोजी बैठक संपन्न झाली.

मराठा आरक्षणचा लढा तेवत ठेवणारे मराठा संघर्ष योद्धा यांनी मराठा समाजास 50% च्या आतील टिकणार आरक्षण व सगे सोयरे याची तात्काळ अंमलबजवणी करावी. या साठी मराठावाडयात प्रत्येक जिल्ह्यात ते शांतता संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 13 जुलै पर्यंत मराठा आरक्षणाचा सकरात्मक निर्णय घ्यावा असा इशारा दिला आहे. तत्पूर्वी त्यांचा मराठवाड्यात दौरा होणार आहे. दि. 10 जुलै रोजी जरांगे पाटील धाराशिव जिल्याच्या दौऱ्यावर असून त्यांची धाराशिव मध्ये “मराठा आरक्षण जागृती शांतता रॅली “ होणार आहे. त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीने ढोकीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत ढोकी व परिसरातील सर्व गावातील मराठा बांधवानी या शांतता रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. सदर रॅली हि शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक येथून सुरु होईल. रॅली शहरातील अण्णाभाऊ साठे चौक, धारासूर मर्दीनी मंदिर,हजरत ख्वाजा शमशोद्धीन गाझी दर्गा, विजय चौक, नेहरू चौक, काळा मारुती, संत गाडगे बाबा चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे रॅली निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकात विशाल सभेत रूपांतर होईल. या रॅलीसाठी ढोकी व परिसरातील 200 ते 250 मराठा युवक स्वयंसेवक म्हणून या रॅलीत नियोजन करण्यासाठी जाणार असल्याची माहिती सकल मराठा समाज ढोकीच्या वतीने देण्यात आली. या बैठकीसाठी जिल्हा सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून बलराज रणदिवे, अक्षय नायकवाडी, सूर्यवंशी, पांडुरंग मते, काकासाहेब लोमटे उपस्थित होते. यावेळी ढोकी व ढोकी परिसरातील शेकडो मराठा युवक नागरिक उपस्थित होते.

 
Top