धाराशिव (प्रतिनिधी)-भाजपचे धाराशिव येथील नेते आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी मंगळवार दि. 30 जुलै रोजी रात्री उशीरा शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला. प्रवेशानंतर त्यांनी आपण स्वगृही परतलो, अशी भावना व्यक्त केली. त्यांच्यासोबत त्यांचे सुपूत्र अभिराज पाटील तसेच निवडक पदाधिकारी उपस्थित होते.

सुधीर पाटील यांनी काही वर्षापूर्वी शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेत जिल्हाप्रमुख पदावर असताना त्यांना पक्षाला मोठी ताकद दिली होती. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, शेतकरी कर्जमाफीसाठी अचलबेट ते सोनारी पायी दिंडी काढली होती. तसेच तेरणा नदी खोलीकरण आदी सामाजिक कामासोबतच शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेवून आधार दिला होता. त्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करून पुन्हा एकदा शिवसेनेचे धनुष्य हाती घेतले आहे. त्यांना एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. सुधीर पाटील यांच्यावर पक्षाकडून लवकरच मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. त्यांच्या स्वगृही परतण्याने जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.

पक्ष प्रवेशानंतर सुधीर पाटील म्हणाले की, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्या रक्तात आहेत. लहानपणापासूनच बाळासाहेबांच्या विचारांचा झंझावात जिल्ह्यात आपण सर्वांनीच पाहिला आहे. त्यामुळेच माझ्या सामाजिक व राजकीय आयुष्याची सुरूवातच शिवसैनिक म्हणून झाली. मात्र मधल्या काळात काही राजकीय स्थित्यंतर बदलत गेली अन्‌‍ मूळ शिवसेनेपासून मी काहीसा दूर गेलो. आज पुन्हा आपल्या स्वगृही परतलोय. शिवसैनिक म्हणून धाराशिव जिल्ह्यात मी राजकीय कार्याला सुरूवात केली. त्यानंतर माझ्या कामाची पध्दत आणि शिवसैनिकांमधला गुण रक्तातच असल्याने शिवसेनेत माला उपजिल्हाप्रमुख म्हणून 3 वर्षे काम करण्याची संधी मिळाली. तर 6 वर्ष धाराशिव जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या काळात शेतकरी व सर्वसामान्यांसाठी अनेक आंदोलने केली. शिवसेनेच्या शाखा गावखेड्यात वाढविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यामुळे आज पुन्हा शिवसेनेत परत येत असताना आपल्या जुन्या घरी आल्याची जाणीव होतेय. स्व. बाळासाहेबांच्या आशिर्वादाने शिवसेनेत 1988 साली मी पक्षप्रवेश केला व 1989 साली धाराशिवमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2014 मध्ये तुळजापूर विधानसभा मतदासंघातून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत जोडलेलं नातं आणि शिवसैनिक म्हणून असलेला बाणा हा कधीही सुटणार नाही. म्हणूनच आज पुन्हा शिवधनुष्य हाती घेत आहे असे सुधीर पाटील म्हणाले.


 
Top