धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव पोलिसांनी मोठी कारवाई करीत 1 कोटी रूपयांचा गांजा जप्त करीत एका आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व नळदुर्ग पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
विशाखापट्टणम येथून हा गांजा धाराशिव मार्गे सोलापूर येथे जात असताना धाराशिव पोलिसांनी 1 कोटी रूपयांचा 524 किलो गांजा जप्त केला. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली. पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी एक गाडी अडवली असताना त्यात गांजा आढळून आला. त्यानंतर ही कारवाई केली. त्यात 7 पैकी 6 आरोपी हे फरार झाले. सोलापूर येथील अतिश माने या आरोपीला पोलिसांनी पकडले असून, इतर आरोपी फरार आहेत. पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आजवरची ही मोठी कारवाई असून, 1 कोटी गांजा व एक स्कर्पिओ असा 1 कोटी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.