धाराशिव (प्रतिनिधी)- भारताच्या कारगिल भागात सन 1999 मध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेले आक्रमण भारतीय शूर सैनिकांनी त्यांच्या साहसाने व धाडसाने खांद्याला खांदा लावून शत्रूशी झुंज देऊन यशस्वीरित्या परतवून लावले.या युद्धास आज 26 जुलै रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहे.
या विजय दिवसाच्या अनुषंगाने शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा व दिव्यांग जवानांचा वेगवेगळ्या स्तरावर गौरव करून त्यांच्या प्रति शासन आणि समाजातर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात करण्यात येत आहे.या शूरवीरांच्या त्यागामुळेच आपले भवितव्य सुरक्षित आहे.याची आठवण समाजास करून देण्यात येत आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्या शूर सैनिकाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा “कारगिल विजय दिवस“ साजरा करण्यात येतो.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आज 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शहीद जवान स्मारक प्रतिकृतीस (अमर जवान) मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरु करण्यात आला.या कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.उपस्थित मान्यवरानीही पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.वीर पत्नी,वीर माता,वीर पिता यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित माजी सैनिक,माजी सैनिक विधवा यांचाही गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष शिफा व शेतकरी संघटनेचे राघुनाथ दादा पाटील, प्रमुख उपस्थिती होती.नारायण अंकुशे,राष्ट्रीय अध्यक्ष,भारतीय जवान किसान पार्टी, रावसाहेब जावळे, माजी सैनिक संघटना अध्यक्ष, धाराशिव व माजी सैनिक अशोक गाडेकर,जिल्ह्यातील 7 वीर पत्नी,वीर माता,वीर पिता,32 माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व अवलंबित तसेच 10 इतर कार्यालयातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे गुरुनाथ कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले.अनिलकुमार मँगशेट्टी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्याक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.