धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर इथला शेतकरी अवलंबून न राहता त्याला बारमाही सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. यासाठी उजनी प्रकल्पातून 7 टीएमसी पाणी लवकरच उपलब्ध होणार आहे. शेतकरी यामधून नगदी पिकाकडे वळून बारामाही पिके घेतील.तसेच शेतीपूरक व्यवसाय व कृषी प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यात येत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले.
परंडा तालुक्यातील वाटेफळ येथे विविध विकास कामे केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात प्रा.डॉ. सावंत बोलत होते.यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,माजी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती दत्तात्रय साळुंखे,परांडा पंचायत समितीचे माजी सभापती गौतम लटके व परांडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल डोके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले, परंडा,भूम व वाशी तालुक्यातील रस्त्यांसाठी विविध योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मतदारसंघातील एकही रस्ता आता निधीअभावी शिल्लक राहणार नाही. या तिन्ही तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी तीन ठिकाणी एमआयडीसी मंजूर केली आहे.एमआयडीसीसाठी लागणारी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या गुढीपाडव्यापर्यंत उजनी प्रकल्पातून सात टीएमसी पाणी सीना कोळेगाव प्रकल्पात येणार आहे. त्यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम होऊन येथे शेतीपूरक उद्योग सुरू होतील आणि यामधून अनेकांच्या हातांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.शेतकरी पाण्याच्या व्यवस्थेतून समृद्ध होण्यास मदत होईल असे प्रा.डॉ.सावंत म्हणाले.
तांदूळवाडी- पाचवड येथील विकास कामांचे लोकार्पण
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी परंडा तालुक्यातील तांदुळवाडी येथे तांदुळवाडी - पाचवड गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण केले.यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,जिल्हा परिषदेचे माजी पशुसंवर्धन व कृषी समिती सभापती दत्तात्रय साळुंखे, परंडा पंचायत समितीची माजी सभापती गौतम लटके व परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल डोके यांची प्रमुख उपस्थिती होती.