धाराशिव (प्रतिनिधी)-आज दि 16 जुलै रोजी दुपारी बरोबर 12.01 वाजता धाराशिव, तुळजापूर परिसरात खूप मोठा आवाज ऐकायला मिळाला. त्या आवाजाच्या धमाक्याने घराच्या खिडक्या, दरवाजे मोठ्या प्रमाणात हादरले. त्यामुळं नागरिकांत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट टाकून चिंता ही व्यक्त केली आहे.
तज्ञाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा आवाज लष्कराच्या अतिवेगात जाणाऱ्या जेट फायटर विमाना मुळे येत आहे. याला सुपर सॉनिक बुम ईफेक्ट असं म्हणतात.
लष्कराची जेट फायटर विमाने जेंव्हा आवाजाच्या वेगापेक्षा प्रचंड जास्त वेगाने आणि कमी उंचीवरून आकाशात प्रवास करतात तेंव्हा असा स्फोटा प्रमाणे मोठा आवाज निर्माण होतो. आणि याच आवाजाच्या कंपना मुळे घरांच्या खिडक्या, दरवाजे हादरतात. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याचे कोणतेही कारण नाही
आपल्या जिल्ह्याच्या आकाशातून लष्कराची/वायूं सेनेची ट्रेनिंग देणारी जेट विमाने सतत जात येत असतात. कारण हैद्राबाद-सिकंदराबाद जवळ (डुडिंगन) येथे वायुसेना अकॅडमी आहे. येथे लढाऊ विमाने चालवण्याचे फायटर जेट पायलट ट्रेनिंग दिलं जाते. त्यांचा पुणे-हैद्राबाद हा हवाई ट्रेनिंग रूट आहे. तो आपल्या जिल्ह्याच्या आकाशातून जातो. म्हणून वारंवार हा आवाजाचा धमाका आपल्याकडे ऐकायला मिळतो.
लष्कराच्या अतिवेगात जाणाऱ्या या जेट विमानामुळे सुपर सॉनिक बुम इफेक्ट आकाशात निर्माण होतो त्यामुळे , सर्वात प्रथम आकाशातून मोठा आवाज येतो, नंतर घराच्या खिडक्या, छत वगैरे हदरल्या जातात, आवाजाच्या तिव्रतेमुळे कधी कधी खिडक्यांच्या काचा ही फुटू शकतात.
पण या प्रकारात भूकंपासारखे खालची जमीन हादरत नाही. फक्त खिडक्या, दरवाजे यांना हादरा बसतो.
विशेष लक्ष दिलं आणि आपण नेमकं त्याच वेळी घरच्या छतावर, किंवा मोकळ्या मैदानात, शेतात असू तर धमाक्याचा मोठा आवाज हा आकाशातून जमिनीच्या दिशेनं आलेला आपल्या लगेच लक्षात येतं आणि कधीकधी त्याच वेळी विमान आकाशातून जात असल्याचा आवाजही ऐकायला मिळतो.
आज दि 16 जुलै दुपारी 12 वाजता धाराशिव, तुळजापूर परिसरात जेंव्हा मोठा आवाज आला, घराच्या खिडक्या हादरल्या अगदी तेंव्हाच आकाशातून विमान जात असल्याचा आवाज पण ऐकायला मिळाला. तेंव्हा आजचा मोठा आवाज हा अतिवेगात जाणाऱ्या फायटर जेट विमानाच्या सॉनिक बुम इफेक्ट मुळेच आला असल्याचे सिद्ध झाले आहे.