धाराशिव (प्रतिनिधी)- आरटीईअंतर्गत खासगी शाळांमधील राखीव जागासंदर्भात सरकारने चुकीचा आदेश काढल्याने गोरगरीबांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवावा अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पाठपुरावा केल्यानंतर या आंदोलनाला यश आले असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख तथा नपचे माजी गटनेते सोमनाथ गुरव यांनी दिली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उलटी प्रतिमा टांगून आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणार्या याचिकेविरोधात अपील दाखल करण्यात आले.सदरील प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर संबंधित अधिकार्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींना इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आंदोलनामुळे राज्यातील अडीच लाखाहून अधिक विद्यार्थ्याना याचा लाभ होणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख तथा नपचे माजी गटनेते सोमनाथ गुरव यांनी सांगितले.