कळंब (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शासनाने 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपायोजना करण्यासाठी आवश्यक चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हील चेअर, फोल्डींग वॉकर कमोड खुर्ची नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी, तसेच मन:स्वास्थ केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन प्रशिक्षणासाठी एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये सहाय देण्यात येणार आहे. ही रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (डिबीटी) प्रणालीद्वारे जमा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई उपनगर मुंबई शहर यांच्या नावे अर्ज करावयाचा असून यासाठी पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, आधारकार्ड व मतदान ओळखपत्राची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुकची छायांकित प्रत, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा स्वयंघोषणापत्र, शासनाच्या इतर योजनेमधून लाभ घेतला नसल्याचे स्वंयघोषणापत्र सादर करणे गरजेचे आहे. आपल्या गावातील सर्व जेष्ठ नागरिकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा. अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावे. अधिक माहितीसाठी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक महासंघ धाराशिव यांनी केले आहे .