तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे अर्थसंकल्प विषयक परीसंवाद आयोजित करण्यात आला होता. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी वरील प्रतिपादन केले. 

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना ते म्हणाले की, अर्थसंकल्पाचे ज्ञान देशातील प्रत्येक नागरिकाला असणे आवश्यक आहे कारण अर्थसंकल्पामध्ये ज्या काही गोष्टींचा उहापोह होतो. त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध हा प्रत्येक व्यक्ती व घटकाशी असतो त्यामुळे विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना या अर्थसंकल्प व या अर्थसंकल्पामध्ये सांगितल्या जाणाऱ्या बाबीविषयी  माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. 2024 - 25 चा अर्थसंकल्प नुकताच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे. हा अर्थसंकल्प मांडत असताना त्यांनी अर्थव्यवस्थेची संबंधित नऊ घटकावर लक्ष केंद्रित केले आहे. ज्यांच्या माध्यमातून येणाऱ्या आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक वृद्धीचे उद्दिष्ट हे 7 % पेक्षा जास्त गाठण्याचे निश्चित केले आहे. या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्याधिष्ठित शिक्षण व प्रशिक्षणावर भर देण्यात आलेला आहे. ज्यामधून देशाच्या विकासासाठी आवश्यक असणारा कुशल मनुष्यबळाचा पुरवठा मुबलक प्रमाणात होऊ शकेल यावर लक्ष केंद्रित करण्यात आले .त्याचबरोबर महिलांचा सर्वांगीण विकास घडून आणण्यासाठी अनेक योजना या अर्थसंकल्पामध्ये सुरू करण्यात आलेल्या आहेत. कृषीचे आधुनिकीकरण घडवून आणण्याच्या अनुषंगाने देखील मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. रिसर्च व इनोव्हेशन यावर देखील या अर्थसंकल्पामध्ये भर देण्यात आलेला आहे. तसेच राष्ट्राचा आर्थिक विकास घडवण्यामध्ये देशातील पायाभूत सेवा सुविधा या दर्जेदार व मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने या पायाभूत सेवा सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. थोडक्यात या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या नवरत्नावरील मोठ्या प्रमाणातील आर्थिक तरतुदीच्या माध्यमातून येत्या कांहीं कालावधीत देशाचा जलद आर्थिक विकास घडवून आणण्याचा सरकारचा मानस दिसून येतो. असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाप्रसंगी डॉ नेताजी काळे, डॉ.मंत्री आर आडे, डॉ सी आर दापके यांच्या सह सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी तर आभार डॉ अनंता कस्तुरे यांनी मानले.

 
Top