तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तुळजापूर मध्ये सर्व सार्वजनिक उत्सवामध्ये होणाऱ्या डॉल्बीच्या वापराने धार्मिक भावना दुखावल्या जात असल्यामुळे शहरात संपूर्णरित्या- कायमस्वरूपी डॉल्बीबंदी करणे बाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी महंत ईच्छा गिरी महाराज, महंत व्यंकट अरण्य महाराज, संतोष जळके, जगदीश पलंगे, दयानंद शिंदे,सूरज लोंढे,अमोल कदम, विजय भोसले व इतर उपस्थितीत होते.
सदरील कार्यास तुळजापुर विधीज्ञ संघ तुळजापूर,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल,भाजपा तुळजापूर,शिवसेना युवा सेना,श्री तुळजाभवनीची प्रक्षाल चॅरिटेबल ट्रस्ट,गोदावरी बहुउद्देशीय संस्था,गोलाई ग्रुप शिवजन्मोत्सव समिती आणि तुळजापुर नगरीतील माता आणि भगिनी यांनी जाहीर पाठिंबा दिला.
श्रीक्षेत्र तुळजापूर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असून, हिंदू धर्माचे धार्मिक केंद्र आहे. संपूर्ण भारत देशातून तसेच विदेशातून अनेक भाविक भक्त आपल्या धार्मिक कुलाचारासाठी तुळजापूर नगरीमध्ये वर्षभर येत असतात.
जास्तीत जास्त पारंपारिक वाद्यांचा वापर करून कोणताही आनंद उत्सव साजरी करावा जेणेकरून वंचित घटकातील परिवारांचा रोजगार हा या निमित्ताने पूर्ण होईल व गोरगरिबांचे कुटुंब देखील उभा राहतील.
यामधे पारंपरिक वाद्य व कला याला चालना देणे, कलाकार व वादक यांना मानधन आणि मानसन्मान मिळवून देणे, भारतीय विविधांगी संस्कृतीचे रक्षण करणे, उत्सव व जयंती यांना समाज पोषक बनवणे आणि शहरामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा उद्देश आहे. श्री क्षेत्र तुळजापूर मध्ये येणाऱ्या भाविक भक्त व शहरवासीयांच्या धार्मिक व सामाजिक भावनांचा विचार करून शहरात सामाजिक शांतता प्रस्थापित होण्यासाठी शहरात संपूर्ण रित्या व कायमस्वरूपी डॉल्बीबंदी करण्यात यावी या अनुषंगाने आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.