धाराशिव (प्रतिनिधी)- भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकुर हे मुंबई येथील मेघदूत येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटी त्यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील पराभवाच्या कारणासह अहवाल सादर केला असल्याचे सांगण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, सहकार विभागाचे प्रदेश सहसंयोजक दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अड. व्यंकटराव गुंड, ॲड. अनिल काळे, सतीश देशमुख, नेताजी शिंदे, ॲड. नितीन भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते. 

भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी संघटनात्मक, आगामी निवडणूका तसेच विविध विकास कामे अशा अनेक विषयावर विस्तृत चर्चा केली. बऱ्याच कालावधीनंतर मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात जात ठाकुर यांनी गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर त्यांनी थेट धाराशिव गाठत पक्ष बांधणी सुरु केली आहे. माजी आमदार ठाकूर फडणवीस यांच्या भेटीनंतर धाराशिव जिल्ह्यात सक्रीय झाले आहेत. ठाकुर यांनी धाराशिव येथे बैठक घेत पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत मार्गदर्शन केले. यावेळी पदाधिकारी यांनी त्यांच्या व्यथा मांडत भावना मोकळ्या केल्या. धाराशिव लोकसभेत महायुतीचा पराभव भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागला असुन आत्मचिंतन बैठकनंतर आता पक्ष संघटन व इतर बाबीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. ठाकूर यांनी सर्वांची बांधीलकी संघटनेसाठी असेल. प्रदेश पातळीवर सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. पक्षासाठी जो वेळ देईल तो आपला असे सांगत त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. यावेळी काही पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त होत त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्यात मुख्यत्वे महायुतीतील मानपान व कुरघोडी, होणारी कुचंबना, विकास निधी व इतर बाबींचा समावेश होता. काही जणांनी स्वबळाचा नारा देत भाजपच्या चिन्हावर उमेदवार व आमदार हवा असा आग्रह धरला. सत्ता असूनही कामे होईना, सहयोगी पक्षांकडुन होणारी परवड अश्या व्यथा मांडल्या.

 
Top