धाराशिव (प्रतिनिधी)- बिहार व आंध्र प्रदेशाला हजारो कोटीचा निधी देऊन केंद्र सरकारने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राला अत्यंत कमी निधी देऊन विकासाला खीळ तर घातलीच परंतु महाराष्ट्रातील कांदा, कापूस, धान ,संत्रा ,सोयाबीन, दूध उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला असल्याची टीका समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते अँड रेवण भोसले यांनी केली आहे .
केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणतीही विशेष तरतूद केली नाही. बिहार व आंध्र प्रदेशावर भरघोस खैरात करत असताना महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत .केंद्रीय अर्थसंकल्पात मोठ-मोठ्या पोकळ घोषणा करून सर्वसामान्य, बेरोजगार तरुण, कष्टकरी कामगार, महिला व युवकांची दिशाभूल केली आहे .देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व महाराष्ट्राला केंद्र सरकारने वाऱ्यावर सोडले असल्याचाही आरोप ॲड भोसले यांनी केला.