धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांसाठी जीवनभर लढणारे भाई उद्धवराव पाटील विरोधी पक्ष नेते होते. त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली असतानाही पक्ष निष्ठेने मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. आजच्या दल बदलू राजकीय पुढाऱ्यांनी आदर्श घ्यावे असे तत्वनिष्ठ निस्पृह राजकारणी म्हणजे भाई उद्धवराव पाटील होते. असे ॲड. हभप. पांडुरंग लोमटे महाराज यांनी बोलताना सांगितले.
झुंजार सेनानी भाई उद्धवराव पाटील यांच्या 40 वी पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे शुक्रवारी सकाळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ॲड. ह. भ. प. पांडुरंग लोमटे महाराज बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी झुंजार सेनानी भाई उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली वाहण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षा शशिकलाताई घोगरे हे होत्या. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, महादेव गवाड, तेरणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, महिला सबलीकरणाच्या सदस्य रेखा जगदाळे, संस्थेचे कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख, उपाध्यक्ष ॲड. अविनाशराव देशमुख, सचिव भाई धनंजय पाटील, उषाताई देशमुख, रंगनाथ खोचरे, प्राचार्य पी. एन. पाटील, उपप्राचार्य एस. पी. मुंडे, पर्यवेक्षक व्ही. के. देशमुख, पर्यवेक्षक अमोल दिक्षित, मुख्याध्यापक कचरू घोडके आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष एम. डी. देशमुख, शशिकलाताई घोगरे यांनी भाई उध्दवराव दादांनी केले कार्य, केलेला त्याग, सामाजिक कामाची उंची यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पी. एन. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सुहासिनी जाधव व ज्योत्स्ना बनजगोळे यांनी केले. तर आभार पर्यवेक्षक अमोल दिक्षित यांनी मानले. सदर कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.