धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नागरीकांनी काल आमदार पाटील यांच्याकडे याबाबत लक्ष देऊन दिलासा देण्याची मागणी केली होती.त्याला अनुसरून आज रस्त्यावरील राडारोडा आणि चिखल तुडवत आ.राणा पाटील यांनी अधिकाऱ्यांना रस्त्याची अवस्था दाखवून दिली.यासाठी जबाबदार अभियंत्यावर कारवाई करा,भुयारी गटाराचे काम झालेल्या ठिकाणी ट्रेंचचे काम तातडीने पूर्ण करा,मुरूम टाकण्यासाठी यंत्रणा वाढवून त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून  नागरिकांना तातडीने दिलासा देण्याचे आदेश दिले.

आर.पी कॉलेज ते जिजाऊ चौक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गटारी तुंबलेल्या आहेत. गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.या रस्त्याची पाहणी करतेवेळी  नागरिक आणि दुकानदार यांनी आ. राणा पाटील यांच्यासमोर प्रशासनाच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचला.यावेळी आमदार पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मोरे यांना तातडीने नालीचे काम करून रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.

विसर्जन विहीर व समता कॉलनीतील महिला व युवकांनी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही परिणामी आम्हाला घराबाहेर पडणे अशक्य झाले असून आपण यावर मार्ग काढा अशी विनंती आ.पाटील यांना केली त्यावर त्यांनी मुख्याधिकारी फड यांना तातडीने रस्ते दुरुस्ती करा,कामांचा दर्जा नीट असला पाहिजे,ज्यांनी यात हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी भाजपा नेते सुरेश देशमुख, नितीन काळे, सुनील काकडे, अमित शिंदे, युवराज नळे, राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजप शहराध्यक्ष अभय इंगळे, युवराज राजेनिंबाळकर, अभिजित काकडे, पाडुरंग लाटे, चंद्रकांत काकडे, सुजित साळुंखे, अमोल राजे, दत्ता पेठे, बापू पवार, बिलाल रझवी, मेसा जानराव, पुष्पकांत माळाळे,आदी उपस्थित होते.

 
Top