धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एस.टी.) प्रमाणपत्र देण्यात यावे, या न्याय मागणीसाठी अनेक दशकापासून वेगवेगळ्या लोकशाही मार्गाने आंदोलने चालू आहेत. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा अनेक वेळा मोर्चे, उपोषण झाले आहेत. तरी शासन कसलीही दखल घेत नाही. यामुळे धनगर समाजात आक्रोश आहे.  त्यासाठी शासनाने योग्य भूमिका घ्यावी व धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे. या न्याय मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 युवकांनी सोमवार दि. 15 जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जाहीर पाठिंबा दिला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शामसुंदर श्रीकांत तेरकर गावसुद, कमलाकर राजेंद्र दाणे बेंबळी, राजू गौतम मैदाड चोराखळी, समाधान युवराज पडळकर येवती हे बांधव उपोषणास बसले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बालाजी डोंगे यांनी उपोषणस्थळी येवून पाठिंबाचे पत्र दिले.  तर येवती ग्रामपंचायतच्या वतीने उपोषणाला पाठिंबाचे पत्र दिले आहे. 

यावेळी समाज बांधव माजी जि. प. सदस्य भारत डोलारे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, अहिल्यादेवी होळकर उत्सव मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे, संतोष वतने, प्रा. सोमनाथ लांडगे,  बालाजी तेरकर, विठ्ठल खटके, अशोक गाडेकर, स्वप्निल सोनटक्के, संदीप वाघमोडे, बालाजी वगरे, आप्पा घायाळ, किशोर डुकरे, अमोल भोजने, विजय रमेश सोनटक्के, अमोल जगन्नाथ मैदाड, इंद्रजीत देवकते आदी उपस्थित होते. जिल्हाभरातून युवकांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाज बांधव उपस्थित होते.

 
Top