भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य ट्रॅक्ट्रर रॅली काढण्यात आली होती. शुक्रवार दि 26 रोजी शहरातील माँ जिजाऊ चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. हजारो ट्रॅक्टर व हजारो सकल मराठा समाज बांधव या रैली मध्ये सहभागी असतानाही रैली अभूतपूर्व शांततेत पार पडली. या ट्रॅक्टर रॅली मध्ये तालुक्यातील हजारो ट्रॅक्टर सहभागी झाले होते. रैली गोलाई चौकात आल्यानंतर सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना आरक्षण मागणीचे निवेदन दिले.
या ट्रॅक्टर रॅलीमध्ये तालुक्यातील हजारो ट्रॅक्टर सहभागी झाले होते. जय भवानी जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, लढेंगे जितेंगे हम सब जरांगे या घोषणाने शहर परिसर दणाणून गेला होता. उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाज गेल्या चाळीस वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देत आहे. गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजवर पाच उपोषणे झाली. मराठा व कुणबी एकच आहेत सांगणारे अनेक पुरावे शासनाकडे आहेत. हे पुरावे मान्य करून सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाण पत्रांचे वाटप करण्यात यावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासनाने मराठा समाज बांधवांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी तालुक्यातील हजारो सकल मराठा समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.